पुणे: वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे शहराच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पुणे मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाला आता वेग मिळणार आहे. मेट्रो लाईन 2 च्या विस्तारित मार्गासाठीची टेंडर प्रक्रिया महामेट्रोकडून लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे, वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल आणि पुणेकरांचा प्रवास आणखी सुलभ होईल.
महामेट्रोने रामवाडी ते वाघोली आणि वनाझ ते चांदणी चौक या दोन महत्त्वाच्या विस्तारित मार्गांना मंजूरी मिळवली आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून, काम वेगाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे मेट्रोचा हा विस्तार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एकूण 28.45 किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन पुणेकरांच्या सेवेत उपलब्ध होईल. या मार्गावर तब्बल 29 मेट्रो स्थानके असतील.
रामवाडी ते वाघोली या मार्गाचा विस्तार वाघोलीपर्यंत केला जाणार आहे. वाघोली हा सध्या वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट मानला जातो. त्यामुळे या मेट्रो लाईनमुळे वाघोली आणि पूर्व पुणे भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल अपेक्षित आहे. या मार्गावर डबल फ्लायओव्हरही प्रस्तावित आहे. मात्र, त्याच्या कामादरम्यान काही काळ वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: Nitin Gadkari On BJP: नागपूरात केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले “घरकी मुर्गी दाल बराबर नको!”, "जुने कार्यकर्ते पण सांभाळा" म्हणत भाजपाला दिला घरचा आहेर
प्रस्तावित स्थानकांमध्ये विमाननगर, सोमनाथ नगर, खराडी बायपास, तुळजा भवानी स्टेशन, उबाळे नगर, उप्पर खराडी नगर, वाघेश्वर मंदिर, वाघोली स्टेशन, सिद्धार्थ नगर, बकोरी फाटा आणि विठ्ठलवाडी स्टेशन यांचा समावेश आहे. यासह, वनाझ ते चांदणी चौक हा दुसरा विस्तार पश्चिम पुण्यातील महत्त्वाच्या केंद्रांना जोडणार आहे. या मार्गावर कोथरुड बस स्थानक आणि चांदणी चौक ही दोन महत्त्वाची स्थानके असतील. हा विस्तार पूर्ण झाल्यास कोथरुड, बावधन आणि पाषाण परिसरातील नागरिकांनाही मेट्रोचा थेट लाभ मिळेल. या दोन्ही विस्तार प्रकल्पांमुळे पुणे शहराच्या दोन्ही टोकांतील वाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस वाढणारा वाहनांचा ताण कमी करण्यास हा प्रकल्प मदत करेल.