नवी दिल्ली: टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा पुन्हा एकदा फुल फॉर्ममध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात, रोहित शर्माने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर नाबाद 121 धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या खेळीत 13 चैकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. रोहितला त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द सिरीज’ या दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
भारताने मालिका गमावली असली तरी रोहितच्या कामगिरीमुळे भारतीय चाहत्यांमध्ये आनंद आहे. कर्णधारपद गमावल्यानंतर रोहितला फॉर्ममध्ये परतणे खूप महत्त्वाचे होते. त्याने आपल्या बॅटिंगने टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे. मालिकेच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये फक्त 8 धावांवर बाद झाल्यानंतर रोहित शर्मावर अनेकांनी टीका केली, मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने पुनरामनाचे संकेत दिले. अखेर, रोहित शर्माने 73 धावा केल्या आणि सिडनीमध्ये शतक झळकावून त्याने शानदार पुनरागमन पूर्ण केले.
हेही वाचा: Shreyas Iyer Injury: धक्कादायक! श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना मोठी दुखापत, पुढील सामन्यांबाबत BCCI ने घेतला निर्णय
रोहित शर्माच्या उत्कृष्ट खेळीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहत्यांनी रोहितवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आणि 'द हिटमॅन इज बॅक' अशा कमेंट्स ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पाहायला मिळत आहे. यादरम्यान, रोहितची पत्नी रितिका सजदेहनेही इंस्टाग्रामवर त्याचा फोटो शेअर केला आणि हार्टच्या इमोटीसह एक रोमँटिक स्टोरी शेअर केली. तिची इंस्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

19 मार्च 2025 रोजी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मा या मालिकेत खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दीर्घकाळ दूर राहिल्यानंतर, त्याने पुन्हा एकदा त्याच्या दमदार फलंदाजीने स्वतःला सिद्ध केले आहे. आगामी आयसीसी वर्ल्ड कप 2027 साठी रोहित शर्माला भारतीय संघात घेण्याची मागणी सर्वत्र होत आहे. त्याचा अनुभव आणि सध्याचा फॉर्म भारतासाठी मोठी ताकद ठरू शकतो, असेही सांगितले जात आहे.