मुंबई: जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही स्पष्टपणे दिसून आला. शुक्रवारी बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव निर्माण झाला आणि निर्देशांकांनी जोरदार घसरण नोंदवली. Nifty 50 ने 25,571 वर गॅप डाउन ओपनिंग घेतल्यानंतर तो 25,513 या दिवसभरातील नीचांकी पातळीवर घसरला, म्हणजेच जवळपास 300 अंकांची घसरण झाली. तर BSE Sensex 82,902 वर उघडून काही मिनिटांतच 82,771 पर्यंत घसरला आणि 900 हून अधिक अंकांची पडझड झाली. Bank Nifty मध्येही 376 अंकांची घसरण होऊन तो 60,359 या स्तरावर व्यवहार करत होता.
तज्ज्ञांच्या मते, आजच्या घसरणीमागील प्रमुख कारण म्हणजे IT क्षेत्रातील AI प्रेरित (Artificial Intelligence driven) विक्री. भारतीय बाजारात IT क्षेत्राचा वाटा सुमारे 10 टक्के असून, प्रमुख निर्देशांकांमध्ये त्यांचे मोठे वजन आहे. अमेरिकन टेक शेअर्समधील रात्रीच्या घसरणीचा परिणाम भारतीय IT कंपन्यांवर झाला. Infosys आणि Tata Consultancy Services (TCS) या आघाडीच्या कंपन्या सेन्सेक्सवरील सर्वाधिक दबाव निर्माण करणाऱ्या ठरल्या.
SEBI नोंदणीकृत मूलभूत विश्लेषक अविनाश गोरक्षकर यांच्या मते, अमेरिकन बाजारातील घसरण आणि आज जाहीर होणाऱ्या US CPI (Consumer Price Index) आकडेवारीपूर्वीची सावध भूमिका ही घसरणीची प्रमुख कारणे आहेत. अमेरिकेतील आर्थिक स्थितीबाबत अनिश्चितता वाढली असून, आठवड्याच्या अखेरीस जोखीम न घेण्याचा कल गुंतवणूकदारांमध्ये दिसून आला. त्यातच भारत-अमेरिका व्यापार करारानंतर झालेल्या भावनिक तेजीच्या पार्श्वभूमीवर नफा आणि वसुली (Profit Booking) देखील वाढली.
हेही वाचा: Abhishek Sharma : पाकिस्तानला भिडण्यापूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली; आजारपणामुळे स्टार फलंदाज अभिषेक शर्माचं वजन घटलं
याशिवाय भारतीय रुपयाची US Dollar (USD) समोरची घसरण आणि अपेक्षेपेक्षा कमकुवत तिमाही निकालांची शक्यता यामुळेही बाजारावर दबाव वाढला. जानेवारी महिन्यातील अमेरिकेतील मजबूत रोजगार आकडेवारीमुळे Federal Reserve कडून लवकर व्याजदर कपात होण्याच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. याचा परिणाम भारतासारख्या उदयोन्मुख बाजारांवर (Emerging Markets) नकारात्मक होतो.
दरम्यान, Geojit Investment चे डॉ. व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, AI शेअर्समधील ही घसरण दीर्घकालीन दृष्टीने भारतासाठी सकारात्मक ठरू शकते. गेल्या वर्षीची जागतिक तेजी प्रामुख्याने AI केंद्रित होती आणि त्यात भारताचा सहभाग मर्यादित होता. त्यामुळे AI ट्रेडमधील शिथिलता कायम राहिल्यास भारतीय बाजारासाठी संधी निर्माण होऊ शकते.
एकंदरित, जागतिक अस्थिरता, IT क्षेत्रातील दबाव, US CPI ची प्रतीक्षा आणि चलनातील चढ-उतार या घटकांनी शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात तीव्र घसरण घडवून आणली. पुढील सत्रात जागतिक संकेत आणि महत्त्वाच्या आर्थिक आकडेवारीवर बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे.
Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!
हेही वाचा: Apple Phone Update: iPhone युजर्ससाठी मोठी बातमी; iOS 26.3 अपडेट लाँच, अँड्रॉइडवरून डेटा ट्रान्सफर आता होणार सुपरफास्ट