आजच्या डिजिटल युगात घरांची सुरक्षा फक्त कुलूप आणि कडीपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट डोअरबेल, बेबी मॉनिटर, स्मार्ट स्पीकर्स आणि वाय-फायशी जोडलेली इतर उपकरणे आता अनेक घरांचा अविभाज्य भाग बनली आहेत. चोरी टाळणे, घरावर 24 तास नजर ठेवणे आणि कुटुंब सुरक्षित असल्याची खात्री मिळवणे या उद्देशाने ही उपकरणे बसवली जातात. पण ज्या तंत्रज्ञानावर आपण सुरक्षिततेसाठी अवलंबून आहोत, तेच तंत्रज्ञान तुमच्यासाठी महाग पडू शकते, ही वस्तुस्थितीही दुर्लक्षित करता येत नाही.
बहुतांश स्मार्ट उपकरणे इंटरनेटशी जोडलेली असतात आणि त्यांची सुरक्षितता पूर्णपणे डिजिटल सुरक्षेवर अवलंबून असते. जर पासवर्ड साधा असेल, डिफॉल्ट सेटिंग बदलली नसेल किंवा सॉफ्टवेअर अपडेट केले नसेल, तर हॅकर्ससाठी घराचे डिजिटल दार उघडेच राहते.
अशा वेळी कॅमेऱ्याची थेट दृश्यफीत पाहणे, मायक्रोफोनद्वारे संभाषण ऐकणे किंवा रेकॉर्डिंग डाउनलोड करणे शक्य होते. काही घटनांमध्ये तर कॅमेऱ्याचा अँगल बदलून घरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात आल्याची उदाहरणेही समोर आली आहेत. ही केवळ गोपनीयतेची पायमल्ली नाही, तर ती थेट सुरक्षेवर घाला घालणारी बाब आहे.
हेही वाचा: Quick Puran Poli recipe: पुरणपोळी बनवणं कठीण वाटतंय? या होळीला डाळ न शिजवता, पीठ न मळता बनवा पुरणपोळी; रेसिपी जाणून घ्या
स्मार्ट सीसीटीव्ही, व्हिडिओ डोअरबेल, बेबी मॉनिटर, स्मार्ट टीव्ही आणि स्मार्ट स्पीकर्स ही उपकरणे विशेषतः संवेदनशील मानली जातात. सुरक्षित नेटवर्कचा अभाव किंवा जुने फर्मवेअर यामुळे सायबर गुन्हेगारांना संधी मिळते. स्वस्त आणि अपरिचित ब्रँडची उपकरणे घेताना अनेकदा सुरक्षा निकष दुर्लक्षित केले जातात. त्यामुळे कमी किमतीचा मोह भविष्यात मोठा धोका ठरू शकतो.
मग स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे? सर्वप्रथम प्रत्येक उपकरणासाठी वेगळा आणि अवघड असा पासवर्ड वापरणे अत्यावश्यक आहे. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनची सुविधा उपलब्ध असल्यास ती त्वरित सक्रिय करावी. नियमित सॉफ्टवेअर अपडेट करणे टाळू नये, कारण या अपडेट्समधूनच सुरक्षेतील त्रुटी दुरुस्त केल्या जातात. घरातील वाय-फाय राऊटरचा पासवर्ड बदलणे आणि WPA3 किंवा किमान WPA2 एन्क्रिप्शनचा वापर करणेही महत्त्वाचे आहे.
तंत्रज्ञान हे सोयीचे साधन आहे, पण त्याचा वापर करताना जागरूकता हवी. स्मार्ट उपकरणांमुळे घर अधिक सुरक्षित होऊ शकते, मात्र निष्काळजीपणा त्यांनाच धोका बनवू शकतो. योग्य सेटिंग्स, नियमित अपडेट्स आणि थोडी डिजिटल सतर्कता या तीन गोष्टी पाळल्यास आपण घराची सुरक्षा आणि वैयक्तिक गोपनीयता दोन्ही जपू शकतो. डिजिटल जगात सुरक्षित राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे अद्यावत माहिती आणि जागरूकता.
हेही वाचा: Israel vs Iran War: तेहरानमध्ये हाहाकार! अमेरिकेच्या हल्ल्यात सर्वोच्च नेते खामेनींनंतर चीफ ऑफ स्टाफ आणि संरक्षण मंत्र्यांचाही मृत्यू