Sunday, March 08, 2026 12:37:57 PM

Thane Railway Station: आता पावसाळ्यात नो टेंशन! बटण दाबताच रुळांवरील पाणी होणार गायब; ठाणे रेल्वे प्रशासनाचा 'मायक्रोटनेल' प्लॅन

45 दिवसांत पूर्ण झालेल्या या कामामुळे आगामी पावसाळ्यात लोकल सेवा सुरळीत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

thane railway station आता पावसाळ्यात नो टेंशन  बटण दाबताच रुळांवरील पाणी होणार गायब ठाणे रेल्वे प्रशासनाचा मायक्रोटनेल प्लॅन

ठाणे: ठाणेकरांसाठी आणि मध्य रेल्वेच्या लाखो प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ठाणे स्थानक परिसरात दरवर्षी पाणी साचून रेल्वे वाहतूक ठप्प होण्याचे मोठे विघ्न आता निघून जाणार आहे. मध्य रेल्वेने अत्यंत विक्रमी वेळेत ठाणे स्थानकात 'मायक्रोटनेल'चे (Micro-tunneling) काम पूर्ण केले असून, यामुळे आगामी पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचण्याची समस्या इतिहासजमा होणार आहे.

ठाणे शहराच्या पश्चिमेकडून येणारे पावसाचे पाणी नैसर्गिक उताराने वाहून जाण्याऐवजी फलाट क्रमांक एक, दोन आणि तीनवर साचून राहत असे. यामुळे मुसळधार पावसात रुळ पाण्याखाली जाऊन सीएसएमटी आणि कल्याण या दोन्ही दिशांची वाहतूक कोलमडत असे. यावर रामबाण उपाय म्हणून मध्य रेल्वेने फलाट क्रमांक एक ते 10 च्या रुळांखालून पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत मार्गिका म्हणजेच मायक्रोटनेल उभारले आहे. हे महामुंबईतील रेल्वे हद्दीतील सर्वाधिक लांबीचे मायक्रोटनेल ठरले आहे. पश्चिमेकडून येणारे पाणी आता या टनेलद्वारे वेगाने पूर्वेकडे वाहून नेले जाईल, ज्यामुळे रुळ कोरडे राहण्यास मदत होईल.

हेही वाचा: Children Aadhar Card: तुमच्या बाळाचे 'बाल आधार' बनवा फिंगरप्रिंटशिवाय तेही खर्च न करता, जाणून घ्या सोप्या स्टेप्स

हे काम आव्हानात्मक होते, कारण ठाणे हे मध्य रेल्वेचे अत्यंत गजबजलेले स्थानक आहे. ट्रान्सहार्बर, मुख्य मार्ग आणि मेल-एक्स्प्रेस अशा तिहेरी वाहतुकीमुळे हजारो गाड्यांची ये-जा असताना पारंपरिक खोदकाम करणे अशक्य होते. इथेच आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल दिसून आली. 'एमबीटीएम' (मायक्रोटनेल बोरिंग मशिन) या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे आणि रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने, रेल्वे वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता 'ट्रेंचलेस' पद्धतीने (कोणतेही खोदकाम न करता) हे काम पार पडले. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र हायटेक व्यवस्था उभारण्यात आली असून, केवळ एका बटणाच्या क्लिकवर पाण्याचा उपसा करणे आता शक्य होणार आहे.

'इच्छा तिथे मार्ग' या उक्तीचा प्रत्यय मध्य रेल्वेच्या या कामगिरीतून येतो. 1 डिसेंबर 2024 रोजी सुरू झालेले हे महाकाय काम, अत्यंत नियोजनबद्ध रित्या अवघ्या 45 दिवसांत, म्हणजेच 15 जानेवारी 2025 रोजी पूर्ण करण्यात आले. दीड महिन्याच्या कालावधीत अहोरात्र मेहनत घेऊन 'मिशन फत्ते' करण्यात आले. रेल्वे प्रशासनाची तत्परता आणि अभियांत्रिकी कौशल्य यांचा हा एक उत्तम नमुना ठरला आहे.

मुंबईची लोकल ही शहराची जीवनवाहिनी आहे आणि ठाणे हे त्यातील एक महत्त्वाचे स्थानक आहे. या प्रकल्पामुळे आगामी पावसाळ्यात लोकलसेवा अबाधित राहील, असा विश्वास विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात प्रवाशांना ज्या मनस्तापाला आणि लेटलतीफ कारभाराला सामोरे जावे लागत असे, त्यातून त्यांची आता कायमस्वरूपी सुटका झाली आहे. आता पाऊस कितीही पडला तरी ठाणे स्थानकात लोकलचा वेग मंदावणार नाही, हे निश्चित!

हेही वाचा: Anil Ambani: सुप्रीम कोर्टाचा अनिल अंबानींना दट्ट्या; 40 हजार कोटींच्या बँक घोटाळ्याचा तपास आता 'फास्ट ट्रॅक'वर


सम्बन्धित सामग्री