मुंबई: दिवाळी म्हटल्यावर आपल्यासमोर दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाचा उत्सव, यासारख्या अनेक गोष्टी येतात. आज भाऊबीज आहे. शास्त्रानुसार, हा सण कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला साजरा केला जातो. यादिवशी, बहीण आपल्या लाडक्या भावाला औक्षण करून टिळा लावतात आणि आपल्या लाडक्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. अशातच, अनेक मुलींना हा प्रश्न पडला असेल की ज्या मुलींना सख्खा भाऊ नाही, त्या मुली भाऊबीज कशा पद्धतीने साजरी करू शकतात? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
असे सांगितले जाते की, ज्या मुलींना सख्खा भाऊ नाही, त्या मुली आपल्या वडिलांना, काकांना, भावासारख्या मित्राला किंवा इतर नातेवाईकांना ओवाळू शकतात. विशेष म्हणजे, हरियाणा, महाराष्ट्र किंवा इतर राज्यात भाऊबीजच्या दिवशी बहिणी चंद्राला आपला भाऊ समजून त्याची पूजा करतात. असे केल्याने बहीण आणि भावाचे नाते अधिक घट्ट होते आणि बहिणींना त्यांच्या भावाकडून आर्शीवाद देखील मिळतात.
हेही वाचा: Bhaubeej Shubhechcha in Marathi : बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण, द्या खास शुभेच्छा!
भाऊबीज सणाची सुरुवात कशी झाली?
शास्त्रानुसार, भाऊबीज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला साजरी केली जाते. अशी अख्यायिका आहे की, यादिवशी यमराज बहीण यमुनाकडे गेला होता. तेव्हा, यमुनाने यमराजचे औक्षण केले आणि आपल्या भावाच्या सुखी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केली. यादरम्यान, यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी यमुनाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा यमुना म्हणाली की, 'तू दरवर्षी माझ्या घरी ये. इतकंच नाही, तर यादिवशी जी बहीण आपल्या भावाचे औक्षण करेल, ती तुला कधीही घाबरणार नाही'. यानंतर, यमराजाने बहीण यमुनाला वरदान दिले आणि या दिवसापासून भाऊबीज सणाची सुरुवात झाली.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिकता आणि परंपरांवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याचा दावा करत नाही.)