मुंबई: जसंजसं आपलं वय वाढतं, त्याप्रकारे आपल्या त्वचेत अनेक बदल दिसू लागतात. तज्ज्ञांच्या मते, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर त्वचेची नैसर्गिक चमक कमी होऊ लागते. चेहऱ्यावर डाग आणि सुरकुत्या दिसणे हे सर्वकाही फक्त वयामुळे नसून आहार, पुरेशी झोप न घेणे आणि बदलत्या जीवनशैलीमुळेही होते. अशा वेळी, योग्य पोषक तत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराला मिळणे खूप गरजेचे असते. वयाच्या चाळीशीनंतर त्वचा तरुण आणि निरोगी कशाप्रकारे ठेवता येईल? चला तर पाहुयात.
त्वचेची तजेलता आणि तरुणपण टिकवण्यासाठी CoQ10, व्हिटॅमिन C आणि E हे घटक अत्यंत उपयुक्त मानले जाते.
CoQ10 म्हणजे काय?
हेल्थलाईन वेबसाईटनुसार, CoQ10 आपल्या शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणारे कंपाऊंड आहे. तसेच, लिव्हर, हृदय, किडनी आणि स्वादुपिंडामध्ये (Pancreas) CoQ10 जास्त प्रमाणात असते, जे शरीरात ऊर्जा वाढवण्यास मदत करते. यासह, CoQ10 मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असते. तसेच, CoQ10 त्वचेच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते, कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत होते.
हेही वाचा: Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा कोरडी झालीये? रोज पेरू खा आणि चेहऱ्यावर आणा नैसर्गिक ग्लो
व्हिटॅमिन C चे फायदे
व्हिटॅमिन सी त्वचेतील तजेला वाढवते आणि कोलेजन उत्पादनाला चालना देते. हे त्वचेला लवचिक ठेवते आणि सूर्यप्रकाशामुळे होणारे नुकसान कमी करते. संत्री, पेरू, लिंबू, स्ट्रॉबेरी आणि ब्रोकोली यांसारखी फळे नियमित खाल्ल्याने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन C मिळते.
व्हिटॅमिन E चे महत्व
व्हिटॅमिन E त्वचेला ओलावा आणि पोषण देते. हे त्वचेला मऊ, गुळगुळीत आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. बदाम, शेंगदाणा लोणी आणि पालक यांसारख्या पदार्थांमध्ये हे मुबलक प्रमाणात आढळते.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)