मुंबई: उद्या दिवाळीचा तिसरा दिवस आहे. यंदा, नरक चतुर्दशी सोमवार, 20 ऑक्टोबर 2025 रोजी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. दिवाळीविशेष सामान खरेदी करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बाजारात गर्दी करतात. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे. अशातच, अनेकांना प्रश्न पडला असेल की, दिवाळीला लक्ष्मी आणि गणपतीची पूजा का केली जाते? याबद्दल आता सविस्तर जाणून घ्या.
धार्मिक मान्यतेनुसार, लक्ष्मी ही धन-संपत्तीची देवी आहे. तसेच, लक्ष्मीची पूजा केल्याने धनाची वृद्धी होते, घरात सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते. असे सांगितले जाते की, कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा करणे गरजेचे आहे. कारण, गणपती हा बुद्धीचा देव आणि विघ्नहर्ता आहे. त्यामुळे, जेव्हा आपण कोणतेही शुभ कार्य करतो, तेव्हा गणपतीची पूजा प्रामुख्याने केली जाते. ज्या घरात गणपतीची पूजा केली जात नाही, त्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही. असे सांगितले जाते की, निव्वळ संपत्ती असून काहीच उपयोग नाही, तर ती संपत्ती टिकवण्यासाठी बुद्धीची आवश्यकता आहे. त्यामुळे, लक्ष्मीसह गणपतीची देखील पूजा केली जाते.
हेही वाचा: How To Identify Sweets: दिवाळीत मिठाई घेताना खबरदारी घ्या! बनावट गोड पदार्थांपासून स्वतःचा बचाव करा
पौराणिक कथेनुसार, एकेदिवशी लक्ष्मी देवीला स्वत:च्या संपत्तीचा खूप गर्व झाला होता. या गर्वाला तोडण्यासाठी, भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितले की, 'तू पूजनीय आहेस. तुझ्याकडे सर्वकाही आहे, मात्र मातृत्व नाही. संततीशिवाय स्त्री परिपूर्ण नसते'. हे ऐकताच, लक्ष्मी उदास झाली आणि पार्वतीसमोर आपली व्यथा मांडली. तेव्हा, पार्वतीने गणपतीला जवळ घेऊन लक्ष्मीच्या स्वाधीन केले. यादरम्यान, पार्वती म्हणाली, 'आतापासून गणपती तुझा पुत्र असेल'. यानंतर, लक्ष्मीचा आनंद द्विगुणीत झाला आणि तिने गणपतीला मांडीवर घेतले. तसेच, लक्ष्मीने गणपतीला वरदान दिले की, 'ज्या घरात माझी पूजा केली जाते, त्या घरात गणेशाचीही पूजा केली जाईल. गणपतीची पूजा न केल्याने देवी लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाईल'. ज्यामुळे, लक्ष्मीची पूजा करताना गणपतीची देखील पूजा केली जाते.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)