Wed. Oct 5th, 2022

‘मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय नसलेला अहवाल खरा मानायचा कसा?’ – ऍड. गुणरत्न सदावर्ते

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाबाबत उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, एसटी विलिनीकरणाच्या अहवालाबाबत सुनावणी पुढे ढकलली असून पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकिल ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा नाही तसेच सरकारच्या दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही, असा आरोप ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारवर केला आहे.

ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्यमंत्र्यांची अहवालावर साक्षरता नसल्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय नसलेला अहवाल खरा मानायचा कसा? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे माहित नाही. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळू द्यायचा नाही. सरकारला कर्मचाऱ्यांचे मरण पाहायचे आहे. तसेच शरद पवारांना कष्टकऱ्यांना न्याय द्यायचा नाही, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

‘मुख्यमंत्र्यांच्या अभिप्रायासह अहवाल सादर करू’

मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय नसलेला अहवाल आज सादर करण्यात आला. यावर कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी सवाल उपस्थित केला आहे. तसेच एसटी विलिनीकरणाच्या अहवालाबाबत सुनावणी पुढे ढकलली असून पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अभिप्रायासह शुक्रवारी न्यायालयात अहवाल सादर करणार असल्याचे एसटी महामंडळाचे वकील ऍड. पिंकी भन्साली यांनी सांगितले आहे. तसेच खेडेगावातील एसटी सेवा अद्यापही सुरू झाल्या नसून सध्या ५५ हजार कर्मचारी अजुनही संपावर कायम असल्याचे ऍड. पिंकी भन्साली यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले अनिल परब?

संपकारी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर यावे, लाखो प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा, तसेच एसटीचे नुकसान करू नये, असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे. तसेच संपकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्यावर राज्य सरकार चर्चा करत असल्याचे परब म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.