‘मी आजही शिवसेनेतच’

आजही शिवसेनेतच आहे, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे बंडखोर नेते उदय सामंत यांनी दिले आहे. शिदेंसह अनेक शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्याने सध्या शिवसेना आणि महाविकास आघाडी दोन्ही संकटात सापडले आहेत. एकपाठोपाठ एक सेनेचे मंत्री शिंदे गटात सामिल होताना दिसत आहेत. राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे देखील गुवाहटीत शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सामंत म्हणाले की, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला कमकुवत करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याला कंटाळून मी गुवाहटीत आल्याची कबुली उदय सामंतांनी राष्ट्रवादीवर केला आहे.
मी आजही शिवसेनेतच आहे, असे स्पष्ट करून उदय सामंत म्हणाले की (स्व.) बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षाची वाईट नजर लागली आहे. घटक पक्षाच्या वाईट नजरेतून शिवसेनेला बाहेर काढण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी मी गुवाहाटीमध्ये आलो आहे. मला रत्नागिरीच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचे आहे की, तुम्ही कुणाच्याही गैरसमाजाला बळी पडू नका. मी शिवसेनेनेतच आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना टिकली पाहिजे, त्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे.