‘हल्ल्याचा मास्टरमाईंड शोधणार’ – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आझाद मैदानात जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र, दुसऱ्या दिवशी कर्मचारी आक्रमक का झाले? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. तसेच या हल्ल्यामागील मास्टमाईंडचा शोध घेत पत्रकार परिषद घेत जाहीर करणार असल्याचे पवारांनी सांगितले आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्यात आले असल्याचेही अजित पवार म्हणाले आहेत.
तसेच, या घटनेत पोलिसांचे अपयश असल्याचेही अजित पवारांनी सांगितले आहे. माध्यमांना आंदोलनाबाबत कळलं पण पोलिसांना का नाही कळलं? असा सवाल उपस्थित करत पोलिसांच्या हलगर्जीपणाबाबत चौकशी सुरू असल्याचेही अजित पवारांनी सांगितले आहे. ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्यात आले आहे. या घटनेमागे कोण आहे, याचा तपास सुरू आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून या घटनेमागचा मास्टरमाईंड कोण याचा शोध सुरू आहे.
दरम्यान, अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र, असे असताना आंदोलन का सुरू ठेवलं? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.