Mon. Jan 24th, 2022

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, तर मी का नाही?- खडसे

विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपाची मंगळवारी जळगावमध्ये सावदा येथे एक प्रचारसभा घेण्यात आली. या सभेत  एकनाथ खडसे यांनी थेट पंतप्रधान होण्याची इच्छा दर्शवली आहे.

काय आहे प्रकरण ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा सामान्य माणूस पंतप्रधान होऊ शकतो, त्यामुळे आपल्यालाही आत्मविश्वास आला की आपणही पंतप्रधान होऊ शकतो असं वक्तव्य माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे व्यक्त केले.

खडसेंनी असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

गुजरातमधील एका छोट्याशा कुटुंबात जन्मलेले, चहा विकणारे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, तर आपण का पंतप्रधान होऊ शकत नाही? आपण पंतप्रधान होण्याची इच्छा का बाळगू नये, असे खडसे गंमतीने म्हणाले.

दरम्यान, खडसेंनी आपल्या भाषणाला हिंदीतून सुरुवात केली. त्यावेळी स्मृती इराणी यांनी त्यांना मराठीतून बोलण्याची विनंती केली.

मात्र, खडसेंनी ‘मला हिंदीतून भाषण करायला आवडते. मी हिंदी विसरू नये म्हणून कधी कधी हिंदीतून भाषण करतो. माझीही संसदेत यायची मनापासून इच्छा होती’, असे सांगत खडसेंनी आपल्या मनातील भावना जाहीरपणे सांगून टाकली.

खडसेंची पवारांवर जोरदार टीका…

तसेच आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मुक्ताईनगर मतदारसंघात माझ्या कन्येला पराभूत करण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत.

एवढंच नाही तर मला संपविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जळगावात येऊन गेले.

पवार राष्ट्रीय नेते असताना त्यांनी अशी भूमिका घ्यावी? असे असेल तर त्यांना राष्ट्रीय नेते म्हणावं तरी कसे?

पवारांमुळे माझी प्रतिष्ठा वाढली, असेही खडसे यावेळी म्हणाले.

आपल्याला पाडण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले असा आरोप करत खडसेंनी पवारांवर जोरदार टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *