यशोमती ठाकूर यांना मुख्यमंत्रीपदी हवेत पवार

‘शरद पवार जर मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते’, असे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान झालेल्या सभेत यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केले आहे.
अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व सभागृहाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात काँग्रेसच्या अमरावती विभाग पालकमंत्री तसेच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ‘शरद पवार जर मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचे चित्र जरा वेगळे असते’ असे विधान केले. दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून प्रतिक्रिया उमटत आहेत.
नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
यशोमती ठाकूर यांनी केलेल्या विधानावर शिवसेना आमदार नील गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना यूपीए अध्यक्ष करायचा सल्ला द्याल का? असा सवाल उपस्थित करत यशोमती ठाकूर यांना टोमणा मारला आहे. तसेच, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लमापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी यशोमती ठाकूर आणि नीलम गोऱ्हे यांच्या वादात पडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.