काही गैरसमज झाले असतील तर दूर होतील – राऊत

एकनाथ शिंदे हे पूर्वीपासूनच आमचे आहेत. आणि ते कायम शिवसेनेत राहतील, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत विस्तृत बातचीत झाली असून सगळं सुरळीत सुरू आहे. काही गैरसमज झाले असतील ते दूर होतील. हा आमचा घरातील विषय असून सगळे पुन्हा परत येतील. आमच्यात चर्चा झाली असून एकनाथ शिंदेंनी कोणत्याही अटीशर्थी ठेवलेल्या नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुरुवारी फोनवर बोलण झालं असून शिंदे आणि त्यांच्यासह बंडावर असलेले सर्व आमदार पुन्हा परततील, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली असल्याचे संजय राऊत म्हणाले. आमदारांमध्ये काही गैरसमज असतील ते दूर होतील, असेही ते म्हणाले. तसेच गुवाहाटीला काझीयारंगा जंगल खूप सुंदर आहे. आमदारांनी पर्यटन करावे, देशभर फिरावे. शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही आणि करणार नाही, असे राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांची गुवाहाटीत बैठक
बंडखोर एकनाथ शिंदे त्यांच्यासह बंडात सामील असलेल्या आमदारांची गुवाहाटीत बैठक घेत आहेत. गुवाहाटीतील रेडिसन हॉटेलमध्ये शिंदे ४० आमदारांसोबत आहेत. येथे पार पडणाऱ्या बैठकीत शिंदे ठाकरे सरकारला पाठिंबा द्यायचा की पक्षाला रामराम ठोकायचा, याबाबत निर्णय घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यास महाविकास आघाडी सरकारवर मोठं संकट कोसळणार आहे.
बुधवारी सकाळी एकनाथ शिंदे आमदारांसह सूरत येथून गुवाहाटी येथे पोहचेले. यावेळी भाजपच्या काही नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही शिंदे यांची भेट घेतली.