Tue. Jun 28th, 2022

पवारांच्या घरावरचा हल्ला कर्मचाऱ्यांना पडला महागात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी एसटी कर्मचारी आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी निवासस्थानी चप्पलफेक आणि दगडफेक करत आंदोलन केले तर पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेल्या १०९ कर्मचाऱ्यांवर न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे. तसेच फौजदारी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणं अशक्य असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. त्यामुळे पवारांच्या घरावर केलेला हल्ला कर्मचाऱ्यांना महागात पडला आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जे कामगार २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होतील त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही असे आदेश आहेत. मात्र, शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानावरील हल्ल्यावर सगळ्यांची नाराजी असतानाच, या हल्ल्यातील १०९ आंदोलकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना सेवेत घेणे अशक्य असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण?

गुरुवारी ७ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढत सुनावणी दिली होती. संपकाऱ्यांना आणखी एक संधी देऊन २२ एप्रिल पर्यंत सेवेत रुजू होण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. २२ एप्रिल पर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना सेवेत रुजू करून घ्यावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या निर्णयाबाबत गुरुवारी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात जल्लोष साजरा केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी ८ एप्रिल (शुक्रवार) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानावर कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक करत आक्रमक स्वरूपाचे आंदोलन केले. दरम्यान, हे रेकी आंदोलन असल्याचे उघड झाले असून या प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.