कर्जबाजारीपणाला कंटाळून पिता-पुत्राची आत्महत्या

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळल्याने पिता-पुत्राने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या पितापुत्राने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. नांदेडमधील लोहा तालुक्यातील वागदरवाडी येथे हा प्रकार घडला आहे.
या पितापुत्राने १४ फेब्रुवारीला दुपारी ४ च्या दरम्यान विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. केरबा पांडू केंद्रे (४० ) आणि शंकर केरबा केंद्रे (१७) अशी मृतांची नावं आहेत.
निर्सगाच्या वक्रदृष्टीमुळे कधी गरजेपेक्षा कमी तर कधी जास्त पाऊस होतो. निसर्गाच्या लहरी काराभारामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.
या अशा प्रकारामुळे शेतकऱ्यांना, बँक आणि सावकाराच्या कर्जाच्या ओझ्याखालून बाहेर पडता येत नसल्याचं या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन समोर येत आहे.
लोहा तालुक्यातील वागदरवाडी येथे हे कुटुंब राहतं. केरबा पांडू केंद्रे हे शेती व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
तसेच त्यांचा १७ वर्षाचा शंकर केंद्रे (मुलगा) ११ वीत शिकत होतो. हे दोघे अनेक दिवसांपासून शेतीसाठी घेतलेलं कर्ज कसं फेडायचे, या चिंतेत होते.
दोघे पितापुत्र १४ फेब्रुवारीला शेताकडे गेले. वागदरवाडी या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर उत्तम केंद्रे यांच्या शेतात विहिर आहे.
या शेतातील विहिरीत या पितापुत्राचं मृतदेह तरंगत असल्याचं एका गुराख्याच्या निदर्शनास आलं.
या गुराख्याने सदर घटनेची माहिती केंद्रे कुटुंबियांना दिली. यानंतर पोलिस आणि गावकऱ्यांच्या मदतीने दुपारी ४ आणि ६ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मृतदेह बाहेर काढल्यानंतर तपासणीसाठी माळाकोळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आलं.
पोलिसांनी या सर्व प्रकरणाची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती मृताचे भाऊ माधव केंद्रे यांनी दिली आहे.
दरम्यान पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.