पुण्यात किराणा, ड्रायफ्रूटच्या मागणीत दहापटीने वाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थिती पूर्ववत होत असल्यामुळे यंदाची दिवाळी सरकारने आखलेल्या नियमांचे पालन करून साजरी होणार आहे. तसेच पुण्यात दिवाळी पहाटचे कार्यक्रम करण्याची परवानगीही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दिवाळीनिमित्त बाजारांत ग्राहकांची गर्दी वाढली असून किराणा आणि ड्रायफ्रूटच्या मागणीत वाढ झाली आहे. किराणा, ड्रायफ्रूटच्या मागणीत तब्बल दहा पटीने मागणी वाढणार असल्याचे पुण्यातील मोठ्या व्यापारांनी सांगितले आहे.
पुण्यात दसरा ते दिवाळी पर्यंतच्या काळात साधारण तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा विश्वास पुण्यातील होलसेल बाजारातील मोठ्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अफगाणिस्तानमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ड्रायफ्रुटचे दर वाढले होते. मात्र आता सर्व ड्रायफ्रूटचे दर पुन्हा स्थिरावले आहेत.
दिवाळीचा फराळ म्हटलं की तेल, पोहा, भाजका पोहा, चकलीचे साहित्य, भाजकी डाळी तसेच लाडूंच्या साहित्यात मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. त्यातही ड्रायफ्रूटलाही ग्राहकांची मोठी मागणी असते. त्यामुळे यंदा दिवाळीनिमित्त फराळाच्या साहित्यासह ड्रायफ्रुटच्या मागणीत दहा पटीने वाढ होणार असल्याचे पुण्यातील मोठ्या व्यापारांनी सांगितले आहे.
यंदा परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे किराणा मालाची मागणी दहापटीने वाढणार आहे. भाजका पोहा १०० पोती एका महिन्यात विकला जायचा, आता दसरा ते देवदिवाळी या 20 दिवसांच्या दरम्यान दहापटीने वाढून एक हजार पोती विकला जाईल. – व्यापारी राजेश शहा, विनोद गोयल