नागपुरात स्थानिक पातळीत ओमायक्रॉन संसर्गात वाढ

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहे. तर ओमायक्रॉन रुग्णांचा आकडाही अधिक आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा आलेख वरचढ होता. परंतु, काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे मुंबईकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र, नागपूरमध्ये चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नागपूरात स्थानिक पातळीवर ओमायक्रॉन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
नागपूरमध्ये ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ चाचणी करण्यात आली असून या चाचणीमध्ये २०१ कोरोनाबाधितांपैकी १९९ रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सोमवारपर्यंत १२६ कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले. तर ‘नीरी’ने तपासणी केलेल्या चाचणीनुसार, ७५ रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याची समोर आले आहे.
‘नीरी’ने आतापर्यंत तीन टप्प्यात २०१ कोरोना रुग्णांच्या नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ केले. त्यातील दोन वगळता उर्वरित १९९ नमुन्यांमध्ये ‘ओमायक्रॉन’ विषाणूचे लागण झाल्याचे आढळले. ज्या नागरिकांमध्ये हा विषाणू आढळला असून, त्यातील ९९ टक्के स्थानिक नागरिक आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे.