१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताची धडक

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने धडक मारली आहे. या विश्वषकाच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला ९६ धावांनी पराभूत करून अंतिम सामन्यात जागा निश्चित केली आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाचा ९६ धावांनी धुव्वा उडवून १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सलग चौथ्यांदा आणि आजवर आठव्यांदा धडक मारली. या विश्वचषकाच्या शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना इंग्लंडसोबत होणार आहे.
दरम्यान, भारताच्या ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाचा कर्णधार यश धुल हा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने कर्णधारास साजेशी खेळी करून वैयक्तिक शतक झळकावले. शेख रशिदने ९४ धावांची खेळी करून त्याला छान साथ दिली. धुल आणि रशीदने तिसऱ्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताला ५० षटकांत पाच बाद करत २९० धावांची मजल मारता आली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव १९४ धावांत गुंडाळला. भारताकडून विकी ओस्तवालने तीन आणि निशांत संधूने दोन फलंदाजांना माघारी धाडले.