Tue. Jan 18th, 2022

हा जुना भारत नाही हे दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना कळून चुकलयं – पंतप्रधान

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालकोटमध्ये केलेल्या कारवाईचे पुरावे मागणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार स्ट्राइक केला आहे. यापूर्वी सुद्धा झालेले हल्ले आणि बॉम्बस्फोटाचे कनेक्शन पाकिस्तानशी जोडले होते. पण आधीच्या सरकारने काय केले ? त्यांनी फक्त गृहमंत्री बदलला.

तुम्ही मला सांगा अशा परिस्थितीत गृहमंत्री बदलायचा की, धोरण? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील सभेत ते बोलत होते.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

मुंबईवरील 26/11 हल्ल्यानंतर सैन्य दल बदला घेण्यासाठी तयार होते. पण त्यांना परवानगी देण्यात आली नाही.

2016 मध्ये उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. सरकारने झोपून राहावे असं तुम्हाला वाटतं का ? चौकीदार झोपत नाही.

पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या सैनिकांनी घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानला धक्का दिला.

एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान रडत होता. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने तयारी केली होती.

उरी सारखा सर्जिकल स्ट्राइक होईल असं त्यांना वाटलं होतं. पण आपण हवाई हल्ला केला.

भारत सर्जिकल स्ट्राइक सारखे काही तरी करेल असे पाकिस्तानला वाटले. त्यांनी सीमेवर सुरक्षा वाढवली. पण आपण हवाई मार्गाने गेलो आणि हल्ला चढवला.

पाकिस्तानची झोप उडवून दिली. या कारवाईने पाकिस्तान इतका घाबरला की, सकाळी 5 वाजल्यापासून त्यांनी टि्वट करायला सुरुवात केली.

तसेच आधीच्या सरकारच्या धोरणांमुळे दहशतवादाचे संकट अधिक गंभीर बनल्याचा आरोप यावेळी मोदींनी केला.

सर्जिकल आणि एअर स्ट्राइकनंतर आता हा जुना भारत राहिलेला नाही हे दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना कळून चुकलयं असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

देशाचे वीर जवान आपली जबाबदारी निभावत आहेत. देशाचे नागरीक म्हणून आपल्यालाही सर्तक राहून आपली जबाबदारी निभावायची आहे, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *