Sat. Sep 18th, 2021

भारत-पाकिस्तान आणि शाहरूख खान

90 च्या दशकात दूरदर्शनवरून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला शाहरुख खान नावाचा मुलगा भविष्यात जगातला सर्वाधिक श्रीमंत कलाकारांच्या यादीत इतक्या वरच्या नंबरवर पोहोचेल असं इतरांना सोडा, खुद्द शाहरूखलाही कधी वाटलं नसेल… तो टीव्हीवर झळकत होता, तेव्हा भारतीय टीव्ही इंडस्ट्री फार मोठी नव्हती. पण ‘फौजी’ मालिकेत त्याने साकारलेला ‘अभिमन्यू राय’ हा त्या काळी लहान थोर सर्वांचाच लाडका होऊन गेला होता. स्वतः शाहरूख खानही भारतीय सैन्यात जाण्याचं स्वप्नं पाहात होता आणि त्यासाठी थोडेफार प्रयत्नही त्याने करून पाहिले होते. एकेकाळी भारतीय सैन्यात जायचं स्वप्न पाहाणारा हा तरूण आज NRI प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलाय, भारताच्या सेक्युलर प्रतिमेचं झगमगतं उदाहरणही बनलाय, तर दुसरीकडे विनाकारण धार्मिक तेढ बाळगणाऱ्यांच्या द्वेषाचं कारण बनलाय. महाकवी ‘होमर’ हा आमच्या भूमीतला आहे, असा वाद जगातले सात देश घालतायत. तसाच वाद शाहरूखबद्दल भारत-पाकिस्तान घालतायत.

srk_Fauji.jpg

 

शाहरूख पक्का भारतीय तर आहेच, तरी त्याच्यावर पाकिस्तानी म्हणून होणारे आरोप काही थांबत नाहीत. दिलीप कुमार यांनी ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान स्वीकारल्याबद्दल त्यांच्यावर भारतातून टीका झाली. शाहरूखही प्रचंड यश चाखताना तीच टीका सहन करतोय. पण त्याला पाकिस्तानी म्हणताना शाहरूख आणि पाकिस्तानचं नातं भारत कधी समजून घेऊ शकतो का हा प्रश्न आहे… त्यासाठी मुळात भारताचं पाकिस्तानाशी असणारं सनातन नातं लक्षात घ्यायला नको का?

srk12.jpg

शाहरूख खानची वांशिक मूळं वायव्य सरहद्द प्रांतातल्या पेशावर येथे आहेत. तेथे त्याचा जन्म झाला नसला, तरीही… पण त्याच्यातल्या अभिनेत्याची, एंटरटेनरची बीजंही कदाचित त्याच पेशावरमध्ये सापडू शकतात. पेशावरमधील एक प्रसिद्ध भाग आहे ‘किस्सा कहानी बाजार’… या जागेशी शाहरूखचं खास नातं आहे.

 

peshawar1.jpg

‘किस्सा कहानी बाजार’ या अजब नावामागेही रंजक इतिहास आहे. एकेकाळी भारत हा अफगाणिस्तानपर्यंत पसरला होता आणि खैबर खिंड हे भारताचा प्रवेशद्वार होतं. तेव्हा अनेक लढवय्ये, व्यापारी खैबर खिंडीचा प्रवास करून अखेर भारतात पोहोचायचे. काही दिवस या भागात मुक्काम करायचे. मग नवे कपडे खरेदी करणं, झिजलेले जोडे दुरूस्त करून घेणं इत्यादी गोष्टी चालत.

khyber.jpg

याशिवाय, त्यावेळी मनोरंजनाची साधनं फारशी नव्हती. त्यामुळे थकलेल्या या लोकांचं मनोरंजन करण्यासाठी गावातली माणसं कथाकथन करत. यात परिकथांपासून ते साहसकथांचं साभिनय सादरीकरण केलं जाई. त्याबद्दल त्यांना मिळणाऱ्या बिदागीवरच त्यांचा चरितार्थ चाले. किस्से कहाण्या ऐकवण्याचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांमुळे हळूहळू या भागाला नावच ‘किस्सा कहानी बाजार’ पडलं.

cropped-qissa-khwani.jpg

थोडक्यात कथा सादर करणं हे येथील बहुतांश लोकांच्या घराण्यात चालत आलेली कला आहे. याच किस्सा कहानी बाजार परिसरात बॉलिवूडचे ज्योष्ठ अभिनेते दिलीप कुमार जन्मले. इथल्याच एका गल्लीत कपूर कुटुंबातील पहिले अभिनेते पृथ्वीराज कपूर तसंच त्यांचे सुपुत्र राज कपूर जन्मले आणि इथल्याच एका हवेलीत जन्मले होते शाहरूखचे वडील ‘मीर ताज महंमद’…

 

srk_home22.jpg

पेशावरचे पठाण

पेशावर हा खरंतर पठाणांचा बालेकिल्ला. पठाण कबिले हे त्या काळी रानटी टोळ्यांप्रमाणे राहत. शस्त्रास्त्रं वापरणं, किडनॅपिंग, ब्लॅकमेलिंग, कर्ज देणं इत्यादी कामं त्यांचा मुख्य व्यवसाय बनून गेलं होतं. पण देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले आणि परिस्थिती बदलून गेली. पंडित नेहरू, सरदार पटेल यांच्याप्रमाणेच गांधींच्या आघाडीच्या अनुयायांपैकी एक होते ते पेशावरी पठाण ‘खान अब्दुल गफार खान’. ते इतके कट्टर गांधीवादी होते, की त्यांना सरहद्द गांधी संबोधलं जाई. त्यांनी प्रयत्नपूर्वक सर्व पठाणांना अहिंसक बनवलं. खुदाई खिदमतगर ही अहिंसावादी स्वातंत्र्यासेनानींची सेना उभी केली.

 

KAGK.jpeg

या अहिंसावादी पठाण संघटनेमध्येच मीर ताज महंमद आणि त्याचं संपूर्ण कुटुंब सामिल होतं. घरातील बांबूंचा व्यवसाय करता करता स्वातंत्र्यासाठी लढण्यात हे खान कुटुंब पुढे होतं. मीर ताज महंमद हे या कुटुंबातलं शेंडेफळ. दिसायला सुंदर आणि अगदी तरूण. इंग्रजी, पश्तू, उर्दू आणि पंजाबी भाषांवर प्रभुत्व… यामुळे मीर ताज महंमद यांच्या सभांना कायम गर्दी होई. खान कुटुंबाला अर्थातच ब्रिटिश सरकारच्या रोषाचा सामना करावा लागे. घरी कमी आणि जेलमध्ये जास्त मुक्काम असे. या सगळ्यात लहानग्या आणि अभ्यासू मीर ताजच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये, म्हणून त्याला उच्च शिक्षणासाठी दिल्लीला पाठवलं.

mir-taj-mohammed-srk-father.jpg

 

आणि फाळणी झाली

दिल्लीमध्ये मीर ताज महंमद LLB चा अभ्यास करत होते आणि पेशावरमध्ये वेगळ्याच घडामोडी घडत होत्या. स्वातंत्र्याची पहाट उगवत होती. पण पेशावरसकट सगळा वायव्य सरहद्द प्रांत पाकिस्तानचा भाग होण्याची चिन्हं दिसू लागली. याविरोधात पुन्हा खान अब्दुल गफार खान आणि त्यांच्या अनुयायांनी आंदोलन सुरू केलं. मुस्लिम लीगला कडाडून विरोध केला. पण अखेर फाळणी झालीच आणि पेशावरमध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पठाणांच्या माथी भारतीय हा शिक्का पुसला जाऊन पाकिस्तानी हा शिक्का बसला.

srk22.jpg

त्याहून भयंकर म्हणजे ज्या पठाणांनी पाकिस्तानला विरोध केला होता, त्यांच्या नावाचं फर्मान निघालं. खान कुटुंबाचंही त्यात नाव होतं. पाकिस्तानऐवजी भारताला पाठिंबा देणारे म्हणून त्यांना जेलमध्ये जावं लागलं. अशा परिस्थितीत दिल्लीहून घरी यायचा प्रयत्न करणाऱ्या मीर ताज महंमद यांना दिल्लीतच अडकून पडावं लागलं. पुन्हा पेशावरला गेल्यास जेलमध्येच आयुष्य काढावं लागेल याची कल्पना त्यांना आली आणि त्यांनी दिल्लीमध्येच आपल्या हिंदू मित्रांसोबत घरात राहाणं पसंत केलं…

peshawar_home.jpg

 

शाहरूख जेव्हा पाकिस्तानात गेला…

दिल्लीतच मीर ताज महंमद विवाहबद्ध झाले. शाहरूख आणि लाला रूख या दोन मुलांचा जन्म झाला. काळ लोटला तरी पाकिस्तानच्या ब्लॅक लिस्टमध्ये असणाऱ्या या स्वातंत्र्यसेनानीला आपल्या कुटुंबाची भेट घेणं शक्य होत नव्हतं. अखेर त्यांना एकदा परवानगी मिळाली. लहानग्या शाहरूखला घेऊन मीर ताज महंमद भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले. आपल्या घरी गेले. तिथे शाहरूखला पहिल्यांदाच आपले नातेवाईक पाहायला मिळाले. भावंडांशी खेळायला मिळालं. लाड झाले. पाकिस्तानच्या अनेक चांगल्या आठवणी घेऊन तो परतला. त्यामुळे पाकिस्तानद्वेषाचे संस्कार त्याच्यावर घडलेच नाहीत. दुसऱ्यांदा 1980 साली तो 14 वर्षांचा असताना पुन्हा सीमा पार करून किस्सा कहानी बाजारमधील आपल्या वडिलांच्या घरी आला. मात्र यावेळी अनुभव थोडा वेगळा होता. वडिलांशी त्यांचे नातेवाईक तितक्या प्रेमाने वागत नव्हते. एकतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. भारत-पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण झाले होते. नातेवाईकांमध्येही या दूरच्या भारतीय भावाबद्दल जिव्हाळा उरला नव्हता. त्यातून मीर ताज महंमद वारंवार येऊन इथल्या संपत्तीत आपला वाटा मागतील, अशी भीती त्यांच्या नातेवाईकांना वाटू लागली. त्यामुळे शाहरूखला आणि त्याच्या वडिलांना या भेटीत नात्यातील प्रेम अटल्याची जाणीव झाली. ‘पुन्हा येऊ नका’, हे ऐकावं लागलं. ही गोष्ट मीर ताज महंमद यांच्या जिव्हारी लागली. ते आजारी पडले आणि त्यातच पुढे कॅन्सरचं निदान झालं, ज्यात त्यांचा अंत झाला.

srk-hey-ram-e1265438816466.jpg

शाहरूख आणि पाकिस्तान

शाहरूख खानला पाकिस्तानात बालपणी ही भावना जरी वाट्याला आली असली, तरी पाकिस्तानातून त्याच्यावर कायमच प्रेमाचा वर्षाव होत राहिला. तो अजूनही होतोच आहे. परत येऊ नका सांगणाऱ्या नातेवाईकांऐवजी आता हाफिज सईदसारखा माणूसही त्याला पाकिस्तानचं निमंत्रण देतोय.

पण गंमत अशी आहे, की शाहरूखची मूळं ज्या पेशावरमध्ये होती, ते पेशावर पाकिस्तानचा भाग नव्हतं. त्याचे वडिल ज्या स्वातंत्र्यासाठी लढले ते पाकिस्तानचं नसून अखंड भारताचं होतं. वडिलांनी आपल्या लहानपणच्या गोष्टी सांगताना कायम पेशावरचे गोडवेच गायले होते. आपल्या मोहल्ल्याबद्दल, तेथील लोकांबद्दल छान छान आठवणीच सांगितल्या होत्या. त्या आठवणीतले लोक ना भारतद्वेष्टे होते ना हिंदूद्वेष्टे… आजही त्याच्या वडिलांच्या गावातल्या आई- आजीच्या वयाच्या महिला त्याला आशीर्वाद देत असतात, तेव्हा आई-वडील गमावलेला शाहरूख त्यांच्याशी ‘तुम्ही पाकिस्तानी, मी हिंदुस्तानी’ असा वाद घालत बसणं शक्यच नाही. फाळणीनंतरही पाकिस्तानातील आपल्या वडिलांच्या गावाचा, आपल्या मुळांचा धिक्कार करू शकत नाही… बेताल वक्तव्यं करण्यापेक्षा आपल्या कामातून दोन्ही देशांतील लोकांमध्ये आपलेपणाची भावना रूजवतोय. आणि जागतिक स्तरावर भारताचा सेक्युलर चेहरा बनून तो ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ म्हणत भारतच आपला ‘स्वदेस’ असल्याचं जाहीर करतोय.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *