Jaimaharashtra news

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार

मोदी सरकारचा आज संध्याकाळी ५:३० वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. केंद्रीय कॅबिनेटमध्ये देशभरातील अनेक नेत्यांची वर्णी लागणार आहे. २० मंत्र्यांना आज पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात येणार आहे. सध्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे.

नव्या कॅबिनेटमध्ये २५ पेक्षा जास्त ओबीसी मंत्री असणार आहेत.तसेच सर्व राज्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळणार आहे. या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल, असे म्हटले जात आहे.

महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, हिना गावित आणि भागवत कराड यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१९ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा पहिलाच विस्तार असून राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न यातून केला जात असल्याचं चित्र आहे.

Exit mobile version