भारताचा ‘संयमी’ विक्रम

शशांक पाटील, मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्ताननंतर सर्वांत कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघासोबत अगदी पूर्वीपासूनचे सामनेही काहीतरी विशेष अशा घटनांचे साक्षीदार आहेत. मग ते शेन वॉर्नच्या स्वप्नात सचिनच येणं असो किंवा अँड्रू सायमंड विरुद्ध हरभजन सिंग यांची ऑनफिल्ड भांडण असो. भारत आणि ऑस्ट्रेलियाची ही भांडण कायमचीच. पण सुरुवातीच्या काळात शांत असणाऱ्या भारतीय संघाला सौरव आणि त्यानंतर विराट सारखे खमके कर्णधार भेटल्यावर भारतही ऑस्ट्रेलियाला जशास तसे उत्तर देऊ लागला.

या सर्व सामन्यांपेक्षा नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या कसोटीत मात्र अशा अनेक घटना पडल्या ज्यातून वर्षानुवर्षे दोन्ही संघात सुरु असलेल्या ‘रायव्हलरी’ ला पुन्हा उजाळा मिळाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सर्व आघातांना भारतीय संघ पुरुन उरला आणि विक्रमी अशी संयमी खेळी करत सामना अनिर्णित केला. तर सामन्याच्या पहिल्या दिवसांपासूनच दोन्ही संघाकडून उत्कृष्ट क्रिकेट खेळण्यात आले. ज्यात ऑस्ट्रलियाने प्रथम फलंदाजी करत ३३८ धावा केल्या ज्याचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव २४४ धावांत आटोपला. ज्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने उत्तम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी तब्बल ४०७ धावांचे आव्हान ठेवले. ज्यानंतर भारताकडून सलामीवीर रोहित शर्मान ५२ धावा करत भारताला सुरक्षित सुरुवात करुन दिली. त्यानंतर पुजाराने ७७ आणि ऋषभ पंतने ९७ धावा करत भारताला सामन्यात मजबूत स्थान मिळवून दिले मात्र पंत आणि पुजाराच्या विकेटनंतर भारताची अवस्था पाच बाद २७२ अशी झाली आणि याचवेळी अनुभवी आर आश्विन आणि नवख्या हनुमा विहारी या जोडीने चिवट अशी संयमी खेळी करत कसोटीच्या अखेरच्या दिवशी तब्बल २५९ चेंडू अर्थात ४३ षटंक खेळून काढत सामना अनिर्णित केला. विशेष म्हणजे कोणत्याही आशियाई संघाला ऑस्ट्रेलियात जाऊन इतकी षटंक खेळता आली नव्हती. याआधी भारतानेच १९८० मध्ये तब्बल ८९.५ षटकं खेळत हा विक्रम केला होता जो आता १३१ षटकं खेळत भारताने आपल्या नावावर कायम ठेवला आहे.

सामन्यात भारताने केवळ ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलदांजी आणि फलंदाजीलाच प्रत्यूत्तर दिले नसून ऑस्ट्रेलियाच्या स्लेजिंगला ही चोख प्रत्यूत्तर दिलं. यात सर्वांत मोठी घटना म्हणाल तर आर. आश्विन आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यांच्यातील. भारताकडून विहारीच्या मदतीने संयमी खेळी करत भारताला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना आश्विनला बाद करण्यासाठी पेन याने त्याला चिडवण्यास सुरुवात केली. ‘’लवकर ही मॅच संपव मग आपण चौथी कसोटी खेळायला ब्रिस्बेनला भेटू’’ ज्यावर प्रत्यूत्तर देत आश्विनने ‘’तुही लवकर भारतात सामना खेळायला ये आणि तेव्हा तुझा करीयर मी संपवतो’’ असे धडाकेबाज उत्तर दिलं. स्टम्पमध्ये लावलेल्या माईकमुळे हा सर्व संवाद रेकॉर्ड झाला ज्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेला भलतंच उधान आलं आहे. विशेष म्हणजे ‘’Come to India’’ असं ट्विटही ट्रेन्ड होताना दिसत आहे. त्यानंतर शेवटच्याच सत्रात आणखी एक धक्कादयक घटना घडली.

भारताचा सेट झालेला फलंदाज ऋषभ पंतने फलंदाजी करताना फलंदाजीसाठी योग्य जागा मिळावी यासाठी स्टम्पजवळ बॅट ठेवण्यासाठी एक छोटा खड्डा केला होता. बहुदा सर्वच फलंदाज असे करत असतात. तर ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ याने थेट क्रिझजवळ येत तो खड्डा मुजवला. विशेष म्हणजे सामना सुरु असताना फलंदाजाशिवाय कोणताच खेळाडू क्रिझजवळ येऊ शकत नाही असे असतानाही स्मिथ याने अशाप्रकारे कुरघोडी केल्यामुळे भारतीय चाहते संतप्त झाले असून समाज माध्यमांवर या चर्चेला देखील उधान आले आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी फिक्सिंगमध्ये अडकलेला स्मिथ आयपीएलमध्ये भारतात आला असता त्याला काही भारतीय चिडवत होते. त्यावेळी स्वत: कर्णधार विराटने भारतीय चाहत्यांना शांत केले होते. मात्र असे असतानाही ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि चाहते यांचे भारतीय खेळाडूंबद्दलचे वर्तन संतापजनक आहे. भारताचा गोलंदाज यालाही दुसऱ्या सत्रात वर्णद्वेषावरुन काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी चिडवले होते, याबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने माफी मागितली असली तरी यासर्व प्रकाराबद्दल क्रिकेट जगतात नाराजीचा सूर पसरला आहे.

दरम्यान या वादांखेरीज सामन्यात उत्कृष्ट क्रिकेटचेही दर्शन झाले. ज्यात विहारी आणि आश्विनची अप्रतिम संयमी खेळी, स्मिथला धावचीत करण्यासाठी जाडेजाने टाकलेली झेप आणि स्टीव्ह स्मिथ याची सर्व सत्रातील उत्कृष्ठ फलंदाजी या सर्वाने सामन्याला चार-चाँद लावले. दरम्यान या रोमांचक सामन्यानंतर अखेरच्या आणि निर्णयात्मक सामन्याची सर्वच वाट पाहत असून १५ जानेवारीला ब्रिस्बेन येथे चौथी कसोटी पार पडणार आहे.