#Indiavsaustralia विराटच्या अर्धशतकाने भारताचा दमदार विजय

विराट कोहलीने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. या विजयासह भारताने 3 टी-20 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली आहे. दुसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. 6 गडी राखून भारताने अखेरचा टी-20 सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात विराटने नाबाद 61 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 165 धावांचं आव्हान भारताने सलामीवीर शिखर धवन-रोहित शर्माची अर्धशतकी भागीदारी आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केले. दिनेश कार्तिकने विराटला 5व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचायला मदत करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
त्याआधी कृणाल पांड्याने टिच्चून मारा करत अखेरच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला 164 धावांवर रोखले. कृणाल पांड्याने सामन्यात 4 फलंदाजांना माघारी धाडले. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फिंच आणि डार्सी शॉर्टने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करुन दिली.