नवी दिल्ली, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी केजरीवाल यांच्या वकिलाकडून एक अर्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे ईडीचे पथक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. केजरीवाल यांचे मोबाईल ईडीने जप्त केले आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. धडक कृती दलाचे पथक केजरीवाल यांच्या बंगल्याबाहेर सज्ज आहे.
याआधी दिल्लीच्या दारू घोटाळ्यात ईडीने केसीआरच्या मुलीला अर्थात तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविताला अटक केली. सध्या के. कविता ईडी कोठडीत आहे. भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आणि तेलंगण सरकारची माजी मंत्री के. कविताला दिल्लीच्या राउस अॅव्हेन्यू न्यायदंडाधिकाऱ्यांनी ईडी कोठडी दिली. यानंतर कविताने दिलेली माहिती आणि हाती आलेले पुरावे याच्या आधारे ईडीने कारवाई सुरू केली आहे.