World's Largest Shivling: बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. येथील निर्माणाधीन 'विराट रामायण मंदिरात' जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची विधीवत स्थापना केली जाणार आहे. तब्बल 210 टन वजन आणि 33 फूट उंची असलेल्या या महाकाय शिवलिंगाचा परिघही 33 फूट आहे. या भव्य प्रतिष्ठापन सोहळ्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार असून, हे शिवलिंग उचलण्यासाठी बंगाल आणि भोपाळ येथून 700 आणि 500 टन क्षमतेच्या विशेष क्रेन मागवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - Toothpaste Controversy : पोलिसांनी टूथपेस्ट परत न केल्याचा वाद पोहोचला कोर्टात, माजी IPS अधिकाऱ्याची तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?
ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व
विराट रामायण मंदिरासाठी कैथवालिया (बहुआरा) या जागेची निवड करण्यामागे एक विशेष धार्मिक संदर्भ आहे. पौराणिक मान्यतेनुसार, प्रभू श्रीराम माता सीतेशी विवाह करून जनकपूरहून परतत असताना या ठिकाणी त्यांनी एक रात्र मुक्काम केला होता. प्रभू रामांच्या सुनेमुळे (बहु) या गावाला 'बहुआरा' हे नाव पडल्याचे सांगितले जाते. हे मंदिर अयोध्या आणि जनकपूर या दोन पवित्र शहरांच्या मध्यभागी स्थित असून, रामजानकी पथावरील या स्थानाला आता 'जानकी नगर' म्हणून ओळखले जाणार आहे.
हेही वाचा - Viral Story : 'आईला आश्रयस्थानात सोडून कामावर ये...', कर्मचाऱ्याला मॅनेजरचा अजब सल्ला, सोशल मिडीयावर संताप
मंदिराची भव्यता आणि वैशिष्ट्ये
हे मंदिर संकुल केवळ आकारानेच मोठे नाही, तर स्थापत्यशास्त्राचा एक अद्भूत नमुना ठरणार आहे. सुमारे 120 एकर परिसरात पसरलेल्या या संकुलात एकूण 22 मंदिरे आणि 12 शिखरे असतील. मंदिराची लांबी 1080 फूट आणि रुंदी 540 फूट असून, यातील मुख्य शिखर 270 फूट उंच असेल. याशिवाय, संकुलात विविध उंचीची 11 अन्य शिखरेही बांधली जात आहेत. पाटण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर आगामी काळात जगभरातील भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल.