Hyderabad Biryani Scam: हैदराबादची जगप्रसिद्ध बिर्याणी सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. शहरातील नामवंत बिर्याणी आउटलेट्सवर टाकलेल्या छाप्यानंतर तब्बल 70,000 कोटी रुपयांच्या करचोरीचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. सुरुवातीला केवळ स्थानिक स्तरावर वाटणारी ही चौकशी आता देशव्यापी अन्न आणि पेय (F&B) क्षेत्रातील मोठ्या घोटाळ्याकडे बोट करत आहे.
दिग्गज फूड चेन्स आयकर रडारवर
नोव्हेंबर 2025 मध्ये आयकर विभागाने हैदराबादमधील पिस्ता हाऊस, शाह गौस कॅफे आणि मेहफिल यांसारख्या अत्यंत लोकप्रिय फूड चेन्सवर शहरव्यापी शोधमोहीम राबवली. या संस्था केवळ भारतातच नव्हे, तर दुबईसारख्या परदेशातही आपले जाळे पसरवून आहेत. सुमारे 50 पथकांनी हॉटेल परिसरासह मालक, संचालक आणि प्रमुख कर्मचाऱ्यांच्या घरांवरही छापे टाकले. या कारवाईत 6 कोटी रुपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणात संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
डिजिटल डेटा आणि सॉफ्टवेअरमध्ये फेरफार
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे आउटलेट्स दरवर्षी शेकडो कोटींचा व्यवसाय करतात, मात्र प्रत्यक्ष दाखवलेला महसूल आणि व्यवहारांमध्ये मोठी तफावत आढळली आहे. अधिकारी सध्या बिलिंग सॉफ्टवेअरमधील फेरफार आणि तिसऱ्या पक्षाच्या खात्यांद्वारे वळवण्यात आलेल्या UPI व्यवहारांची (Digital Payment Trails) चौकशी करत आहेत. जप्त केलेल्या 'टेराबाइट्स'मधील डिजिटल डेटाच्या विश्लेषणानंतर हा आकडा 70,000 कोटींच्या घरात जाण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - Dhule : भयंकर! स्मशानातील सोनं चोरीला, अंत्यविधीनंतरची राखही राहिली नाही शिल्लक; धुळ्यात चाललंय काय?
देशव्यापी नेटवर्कचा संशय
हा तपास केवळ हैदराबादपुरता मर्यादित नसून, 2019-20 पासून देशभरातील हॉटेल व्यवसायात अशाच प्रकारचे करचोरीचे नेटवर्क कार्यरत असल्याचे संकेत मिळत आहेत. घोषित न केलेले उत्पन्न आणि विक्री लपवल्याप्रकरणी आता कर मागणी, दंड आणि फौजदारी खटले भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या कारवाईमुळे हॉटेल उद्योगातील आर्थिक पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.