Friday, March 13, 2026 12:45:17 PM

Defense Stocks : इराण-इस्रायल युद्धादरम्यान शेअर बाजारात मोठी पडझड, पण डिफेन्स शेअर्समध्ये तेजी; कोणत्या कंपन्यांचे अच्छे दिन?

जागतिक अशांततेच्या काळात शस्त्रास्त्रे आणि संरक्षण उपकरणांची मागणी प्रचंड वाढणार, या अंदाजामुळे गुंतवणूकदारांनी 'डिफेन्स स्टॉक्स'मध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे.

defense stocks  इराण-इस्रायल युद्धादरम्यान शेअर बाजारात मोठी पडझड पण डिफेन्स शेअर्समध्ये तेजी कोणत्या कंपन्यांचे अच्छे दिन

Defense Stocks : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद सोमवारी भारतीय शेअर बाजारावर उमटले. एका बाजूला भू-राजकीय तणावामुळे सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला असताना, दुसऱ्या बाजूला संरक्षण क्षेत्रातील (Defense Sector) कंपन्यांच्या शेअर्सनी मात्र 13 टक्क्यांपर्यंतची मोठी भरारी घेतली आहे. जागतिक अशांततेच्या काळात शस्त्रास्त्रे आणि संरक्षण उपकरणांची मागणी प्रचंड वाढणार, या अंदाजामुळे गुंतवणूकदारांनी 'डिफेन्स स्टॉक्स'मध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे.

पारस डिफेन्सचा 'तेजी'चा चौकार; गुंतवणूकदार मालामाल
सोमवारच्या व्यवहारात 'पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज' या कंपनीच्या शेअरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शुक्रवारी 638.30 रुपयांवर बंद झालेला हा शेअर थेट 13.14 टक्क्यांनी वधारून 722.20 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. जरी बाजार बंद होताना काहीशी नफावसुली झाली असली, तरी हा शेअर 5.95 टक्क्यांच्या वाढीसह 676.25 रुपयांवर स्थिरावला. युद्धाच्या काळात तांत्रिक आणि अंतराळ क्षेत्रातील संरक्षण उपकरणांची गरज वाढणार असल्याने गुंतवणूकदारांनी या शेअरला पसंती दिली आहे.

HAL आणि BEL मध्येही खरेदीचा जोर; सरकारी कंपन्यांना पसंती
देशातील दिग्गज सरकारी संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्येही सोमवारी चांगली हालचाल दिसून आली. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चा शेअर दिवसाच्या सुरुवातीला काहीसा घसरला होता, मात्र व्यवहारादरम्यान त्याने 3982.60 रुपयांपर्यंत मजल मारली आणि अखेर 1 टक्क्याच्या वाढीसह 3951.75 वर बंद झाला. तसेच, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) चा शेअर 442 रुपयांवर उघडल्यानंतर 456.80 रुपयांपर्यंत पोहोचला आणि 2.09 टक्क्यांच्या नफ्यासह 453.75 रुपयांवर स्थिरावला. भारत डायनॅमिक्सच्या शेअर्समध्येही गुंतवणूकदारांनी लक्षणीय रस दाखवला आहे.

हेही वाचा - Iran-Israel War : इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम आता होणार स्वयंपाकघरावर? डाळी आणि एलपीजी महाग होण्याची शक्यता

तेजीमागचे मुख्य कारण, निर्यात ऑर्डरची वाढती संधी
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर मध्य पूर्वेतील तणाव अधिकच चिघळला आहे. या जिओ-पॉलिटिकल (Geopolitical) अस्थिरतेमुळे जगभरातून संरक्षण उपकरणांची मागणी वाढण्याची दाट शक्यता आहे. भारतीय संरक्षण कंपन्यांना भविष्यात मोठ्या निर्यात ऑर्डर मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. युद्धाच्या धोक्यामुळे गुंतवणूकदारांना सध्या इतर क्षेत्रांपेक्षा डिफेन्स स्टॉक्समध्ये अधिक 'सुरक्षितता' वाटत आहे, ज्यामुळे या कंपन्यांचे मूल्यांकन वाढत आहे.


सम्बन्धित सामग्री