Luxury Brand Fraud: जर तुम्हाला ब्रँडेड वस्तूंच्या खरेदीवर मिळणाऱ्या मोठ्या सवलतींची (Discounts) ओढ असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. दिल्लीच्या वसंत कुंज भागातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या मॅसिव्ह डिस्काउंट सेलवर पोलिसांनी छापा टाकला आणि एक मोठे रॅकेट उघडकीस आणले. हॉटेलच्या रूममध्ये आयोजित या विक्रीत नामांकित ब्रँड्सच्या नावाखाली बनावट (Duplicate) कपडे, घड्याळे आणि हँडबॅग्जची सर्रास विक्री केली जात होती. 3 मे 2026 रोजी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई करून बनावट वस्तूंचा मोठा साठा जप्त केला.
पोलिसांच्या छाप्यात काय सापडले?
या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट माल हस्तगत केला आहे. यामध्ये 'मायकल कोर्स'च्या 20 हँडबॅग्ज, 10 आलिशान घड्याळे (ज्यामध्ये ओमेगा, टिसॉट आणि अरमानी एक्सचेंजचा समावेश होता), 'ॲलन सोली'च्या 1,060 ट्रॅक पँट्स, 272 टी-शर्ट्स, 'पीटर इंग्लंड'चे 155 टी-शर्ट्स आणि 'व्हॅन ह्युसेन'चे 61 टी-शर्ट्स जप्त करण्यात आले. याशिवाय घटनास्थळावरून 2,87,210 रुपयांची रोकड, 'पाइन लॅब्स'ची 5 कार्ड स्वाइप मशीन्स आणि UPI QR कोड स्कॅनर्स देखील जप्त करण्यात आले आहेत.
अस्सल वाटणारी 'बनावट' विक्री; अशा प्रकारे व्हायची ग्राहकांची फसवणूक
आरोपींनी ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी निर्यात अतिरिक्त साठा (Export Surplus) आणि मर्यादित आवृत्ती (Limited Edition) अशा संज्ञांचा वापर केला होता. खरेदीसाठी आलिशान हॉटेलची निवड केल्यामुळे आणि तिथे रीतसर बिले तसेच ऑनलाइन पेमेंटची सोय असल्यामुळे ग्राहकांना या वस्तू बनावट असल्याचा संशय येत नसे. ही सर्व विक्री 'ब्रँडेड' माल 'ऑफ-सीझन'मध्ये स्वस्त मिळत असल्याच्या नावाखाली केली जात होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार फारूक अहमद असून तो दिल्लीसह इतर शहरांतील मोठ्या हॉटेल्समध्ये असे बनावट प्रदर्शन भरवतो.
हेही वाचा - Pune Crime: पुणे पुन्हा हादरलं! नराधम बापाने क्षुल्लक कारणावरून लेकीचा घेतला जीव; आधी लाकूड कापायच्या मशीनने वार, नंतर...
आरोपीला कोठडी आणि पोलिसांचा इशारा
या प्रकरणी पोलिसांनी हरियाणातील नूह येथील रहिवासी असलेल्या 51 वर्षीय इक्बालला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून मुख्य सूत्रधार फारूक अहमदचा शोध सुरू आहे. 'ब्रँड प्रोटेक्टर्स इंडिया प्रा. लि.' यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीपी राजकुमार आणि निरीक्षक आशिष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक पुढील तपास करत आहे. पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, आलिशान ठिकाण आणि मोठी सवलत पाहून आंधळेपणाने खरेदी करू नका. शंका आल्यास अधिकृत हेल्पलाइनवर खात्री करा.