Sunday, March 08, 2026 11:52:41 PM

INS Anjadip: शत्रूच्या पाणबुड्यांचा कर्दनकाळ! 'INS अंजदीप' भारतीय नौदलात सामील, काय आहेत खास वैशिष्ट्ये? वाचा

चेन्नई बंदरात पार पडलेल्या एका भव्य समारंभात नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्या उपस्थितीत हे जहाज नौदलाच्या सेवेत रुजू झाले.

ins anjadip शत्रूच्या पाणबुड्यांचा कर्दनकाळ ins अंजदीप भारतीय नौदलात सामील काय आहेत खास वैशिष्ट्ये वाचा

INS Anjadip: भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात शुक्रवारी मोलाची भर पडली आहे. शत्रूच्या पाणबुड्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्यात माहीर असलेली 'अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट' (ASW-SWC) प्रकल्पातील चौथी युद्धनौका 'आयएनएस अंजदीप' (INS Anjadip) भारतीय नौदलात अधिकृतपणे दाखल झाली आहे. चेन्नई बंदरात पार पडलेल्या एका भव्य समारंभात नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्या उपस्थितीत हे जहाज नौदलाच्या सेवेत रुजू झाले.

'डॉल्फिन हंटर'ची स्वदेशी झेप
'डॉल्फिन हंटर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युद्धनौकेचे वैशिष्ट्य म्हणजे याचे 80 टक्के पेक्षा जास्त घटक पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहेत. कर्नाटकच्या कारवार किनाऱ्याजवळील ऐतिहासिक 'अंजदीप' बेटावरून या जहाजाचे नामकरण करण्यात आले आहे. 77 मीटर लांबीच्या आणि 1400 टन वजनाच्या या युद्धनौकेची रचना प्रामुख्याने उथळ किनारी भागात जलद प्रतिसाद देण्यासाठी आणि दीर्घकाळ मोहिमा राबवण्यासाठी करण्यात आली आहे.

पाण्याखालील धोक्यांचा करेल नायनाट
आयएनएस अंजदीप हे आधुनिक पाणबुडीविरोधी युद्ध उपकरणांनी आणि प्रगत 'इंटिग्रेटेड कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टिम'ने सुसज्ज आहे. यात 'अभय' नावाचे हल-माउंटेड सोनार बसवण्यात आले आहे, जे पाण्याखालील धोके अचूकपणे शोधण्यास मदत करते. ही युद्धनौका हलक्या वजनाचे टॉर्पेडो आणि पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे, ज्यामुळे शत्रूच्या पाणबुड्यांना पळता भुई थोडी होईल.

2035 पर्यंत 200 जहाजांचे उद्दिष्ट
या सोहळ्याप्रसंगी बोलताना नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी नौदलाच्या विस्ताराबाबत मोठी माहिती दिली. ते म्हणाले की, "2026 पर्यंत नौदलात आणखी सुमारे 15 जहाजे सामील करण्याची योजना आहे, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा वेग असेल. भारतीय नौदलाने 2035 पर्यंत 200 हून अधिक जहाजांचा ताफा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे." सध्या देशातील विविध शिपयार्डमध्ये 50 हून अधिक जहाजांचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे.

हेही वाचा - PM Vishwakarma Yojana: कारागिरांसाठी केंद्र सरकारची मोठी भेट! 18 कामांचे प्रशिक्षण आणि 3 लाखांपर्यंत स्वस्त कर्ज; जाणून घ्या, अर्ज कसा करायचा?

तटीय सुरक्षेसाठी मैलाचा दगड
आयएनएस अंजदीपच्या समावेशामुळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक अभेद्य होणार आहे. विशेषतः उथळ पाण्यात शत्रूच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी हे जहाज नौदलासाठी 'गेम चेंजर' ठरेल.


सम्बन्धित सामग्री