Tonk Banas River Accident
Edited Image
जयपूर: राजस्थानमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. मंगळवारी टोंक शहरातील फ्रेझर ब्रिज येथे असलेल्या बनास नदीत बुडून 8 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक लोकांच्या मदतीने तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी सांगितले की, सर्व तरुण जयपूरच्या घाटगेट आणि हसनपुरा भागातील आहेत. ईद-उल-अधाचा सण साजरा केल्यानंतर, मंगळवारी जयपूर येथील 11 जण टोंक बनास नदीवर पिकनिकसाठी आले होते. त्यापैकी तिघांनी तीरावर जेवण बनवण्यास सुरुवात केली. त्याच वेळी 8 जण बनास नदीत आंघोळ करण्यासाठी गेले. या दरम्यान, खोलवर गेल्यावर ते बुडू लागले. काठावर उपस्थित असलेल्या काही लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यानंतर, घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. त्यानंतर स्थानिकांनी बुडलेल्या तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुर्देवाने या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - ऐकावं ते नवलचं! चक्क चोरांनी गावकऱ्यांविरुद्ध दाखल केला FIR; म्हणाले, 'आम्हालाही अधिकार आहे...!'
दरम्यान, मृतांमध्ये हसनपुरा येथील रहिवासी नौशाद, हसनपुरा येथील रहिवासी कासिम, हसनपुरा येथील रहिवासी फरहान, घाटगेट येथील रहिवासी रिजवान, पानीपेच कच्ची बस्ती येथील रहिवासी नवाब खान, घाटगेट येथील रहिवासी बल्लू, पाणीपेच कच्ची बस्ती येथील रहिवासी साजिद, रामगंज बाजार येथील रहिवासी नवीद यांचा समावेश आहे. सर्व मृतांचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान आहे. लोकांनी सांगितले की कदाचित मृतांना पोहता येत नव्हते. म्हणून ते बुडाले. किंवा एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करताना ते बुडाले. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -'आम्ही कार्यक्रम आयोजित केला नव्हता...'; बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मोठे विधान
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी व्यक्त केला शोक -
या अपघातावर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया 'एक्स' वर लिहिले, 'टोंक जिल्ह्यात असलेल्या बनास नदीत बुडून तरुणांच्या मृत्यूची बातमी खूप दुःखद आणि वेदनादायक आहे. घटनेची माहिती मिळताच, जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्यांनी मृतांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि शोकाकुल कुटुंबाला हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती द्यावी. ओम शांती!