Assam Election Result 2026: आसाम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. ताज्या कलानुसार, आसाममध्ये भाजप प्रणित NDA पुन्हा एकदा सत्तेत येण्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, काँग्रेसला मोठे धक्के बसले आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेसचे दिग्गज नेते गौरव गोगोई यांचा जोरहाटमध्ये पराभव झाला आहे.
मुख्यमंत्री हिमंत सरमांची 63,029 मतांची मोठी आघाडी
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जलुकबारी विधानसभा मतदारसंघातून विक्रमी कामगिरी केली आहे. त्यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार बिदिशा नियोग यांच्यावर 63,029 मतांची मोठी आघाडी घेतली आहे. जलुकबारीमध्ये एकूण 18 फेऱ्यांपैकी 12 फेऱ्या पूर्ण झाल्या असून, सरमा यांची ही आघाडी मतमोजणीच्या प्रत्येक फेरीगणिक वाढत आहे. अद्याप 5 फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे.
जोरहाटमध्ये गौरव गोगोईंचा पराभव; भाजपचा झेंडा
आसामच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का जोरहाट मतदारसंघात बसला आहे. काँग्रेसचे बडे नेते गौरव गोगोई यांना या मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी गोगोई यांचा 23,182 मतांच्या फरकाने पराभव करत जोरहाटची जागा खिशात घातली आहे. हा काँग्रेससाठी राज्यातील सर्वात मोठा वैयक्तिक पराभव मानला जात आहे.
NDA 100 जागांचा टप्पा ओलांडणार?
नाहरकटिया विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार तरंग गोगोई यांनी निकालांवर भाष्य करताना मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिलेली विकासाची आश्वासने पूर्ण केली असून मतदारांनी त्या अजेंड्याला स्वीकारले आहे. राज्यातील एकूण कामगिरी पाहता NDA सहज 100 जागांचा टप्पा ओलांडेल." पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिमंत सरमा यांच्या दुहेरी नेतृत्वामुळे विरोधकांचा प्रभाव राज्यात पूर्णपणे कमी झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा - MK Stalin Defeat: तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर; मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव
विकास-केंद्रित राजकारणाचा विजय
आसाममधील ही निवडणूक पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली होती. जलुकबारीमध्ये हिमंत सरमा यांच्या सातत्यपूर्ण आघाडीने हे दाखवून दिले आहे की, जनतेने सध्याच्या सरकारच्या कामकाजावर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेसला मात्र आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत असून, गोगोईंसारख्या नेत्यांचा पराभव पक्षाच्या चिंतेत भर टाकणारा आहे.