Jhabua Crime: सोशल मीडियाचे वेड आणि लाईक्सची भूक कौटुंबिक नात्यांवर कशी घाला घालत आहे, याचे एक भयंकर उदाहरण मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात समोर आले आहे. रील बनवण्यास आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यास पतीने विरोध केल्यामुळे, एका पत्नीने आपल्या पतीला गळा दाबून संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येपूर्वी या महिलेने यूट्यूबवर 'गुन्हा कसा करावा' याची पद्धत शोधली होती.
नेमकी घटना काय?
ही घटना झाबुआ जिल्ह्यातील थंडला पोलीस स्टेशन परिसरात घडली. गेल्या गुरुवारी, 25 वर्षीय कैलाश नावाच्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याने सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक वाटत होता आणि कैलाशची पत्नी मृतदेहाजवळ बसून शोक व्यक्त करत होती. मात्र, मृताच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार नोंदवली की, रात्री उशिरा पती-पत्नीमध्ये मोठा वाद झाला होता.
हेही वाचा - Online Shopping Fraud: स्वस्त साडीचा मोह आणि हजारोंचा फटका! इंस्टाग्रामवरील बनावट फॅशन पेजमुळे तरुणीची फसवणूक
रील आणि सोशल मीडियाचा वाद
पोलीस तपासात समोर आलेले वास्तव अत्यंत विदारक आहे. घटनेच्या एक दिवस आधी कैलाशच्या पत्नीने एका लग्नात नाचताना स्वतःचा व्हिडिओ शूट केला होता. तिला हा व्हिडिओ रील म्हणून सोशल मीडियावर शेअर करायचा होता, मात्र कैलाशने त्याला कडक शब्दांत विरोध केला. यावरून दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले. याच रागातून पत्नीने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले.
यूट्यूबवरून घेतली गुन्ह्याची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने हत्येपूर्वी यूट्यूबचा आधार घेतला होता. तिने गुन्ह्याची पद्धत शिकून घेतली आणि रात्री कैलाश झोपेत असताना त्याच्याच पगडीने त्याचा गळा आवळून त्याला संपवलं. पोलिसांनी जेव्हा तिची कडक चौकशी केली, तेव्हा तिने आपला गुन्हा मान्य केला. सध्या पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.