ISRO CMS-03 Launch: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज भारतीय नौदलासाठी ऐतिहासिक मोहिम राबवणार आहे. रविवारी संध्याकाळी 5:26 वाजता, इस्रो आपले ‘बाहुबली’ रॉकेट LVM-3 वापरून नौदलाचा प्रगत संप्रेषण उपग्रह GSAT-7R (CMS-03) अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. हे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लाँच पॅडवरून पार पडणार असून, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा अध्याय आज लिहिला जाणार आहे.
नौदलाच्या ताकदीत मोठी भर
GSAT-7R हा उपग्रह भारतीय नौदलाच्या संप्रेषण नेटवर्कला अधिक बळकट करणार आहे. 4410 किलो वजनाचा हा उपग्रह आतापर्यंतच्या सर्वात जड भारतीय संप्रेषण उपग्रहांपैकी एक आहे. तो जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये स्थापन केला जाईल, जिथून तो संपूर्ण भारतीय भूभाग आणि विस्तीर्ण महासागरीय क्षेत्रांना सुरक्षित सिग्नल सेवा पुरवेल. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, या उपग्रहात अनेक स्वदेशी प्रणालींचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे भारताचे समुद्री संरक्षण आणि गुप्त संप्रेषण नेटवर्क अधिक मजबूत होईल.
हेही वाचा - Apple Watch: अॅपल वॉचमुळे समजणार उच्च रक्तदाबाची लक्षणे, आता एआय चालवणार तुमची हेल्थ अलर्ट सिस्टम
‘बाहुबली’ रॉकेटची वैशिष्ट्ये
GSAT-7R उपग्रहाचे प्रक्षेपण LVM-3 (लॉंच व्हेइकल मार्क-3) या भारताच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटद्वारे होणार आहे.
रॉकेटची उंची: 43.5 मीटर
एकूण वजन: 642 टन
ही LVM-3 ची पाचवी ऑपरेशनल उड्डाण मोहीम आहे. याच रॉकेटने यापूर्वी भारताला अभिमान वाटेल अशी चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे चंद्रावर पोहोचवली होती.
हेही वाचा - Zepto: ग्राहकांसाठी झेप्टोची आकर्षक रणनीती, ब्लिंकिट आणि स्विगीलाही मागे टाकणार का?
इस्रोने यापूर्वी 5 डिसेंबर 2018 रोजी आपला सर्वात वजनदार उपग्रह जीसॅट-11 फ्रेंच गयानाहून प्रक्षेपित केला होता. आता GSAT-7R च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताची अवकाश-आधारित संरक्षण क्षमता आणखी एक पाऊल पुढे जाईल. आजची मोहीम भारताच्या ‘आत्मनिर्भर अवकाश संरक्षण’ दृष्टीकोनातील एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. नौदलाच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेला GSAT-7R उपग्रह आणि ‘बाहुबली’ LVM-3 रॉकेट यांचे एकत्रित यश भारताला जागतिक संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक सक्षम स्थान मिळवून देईल.