Sunday, May 10, 2026 08:27:17 PM

Strait of Hormuz: जागतिक ऊर्जा संकटात मोठा दिलासा; अमेरिका आणि इराणमध्ये करार, 'होर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा खुली होणार

व्यापारीदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानली जाणारी 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) टप्प्याटप्प्याने पुन्हा खुली करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे.

strait of hormuz जागतिक ऊर्जा संकटात मोठा दिलासा अमेरिका आणि इराणमध्ये करार होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार

Strait of Hormuz: गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावर चिंतेचा विषय ठरलेल्या अमेरिका आणि इराण संघर्षात अखेर एक महत्त्वाची सकारात्मक घडामोडी समोर आली आहे. व्यापारीदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानली जाणारी 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) टप्प्याटप्प्याने पुन्हा खुली करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. अरबी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने आपली नौदल नाकेबंदी शिथिल करण्याच्या बदल्यात इराणने हा मार्ग खुला करण्यास संमती दर्शवली आहे.

अडकलेल्या जहाजांचा मार्ग मोकळा होणार
इराणने हा मार्ग बंद केल्यामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मात्र, नव्या करारानुसार आता अडकलेल्या व्यापारी जहाजांना तातडीने बाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "नाकेबंदी शिथिल करण्याबाबत दोन्ही बाजूंनी सहमती झाली असून, पुढील काही तासांतच जहाजांची वाहतूक पूर्ववत होण्यास सुरुवात होईल." हॉर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील ऊर्जा पुरवठ्याची जीवनवाहिनी मानली जाते, त्यामुळे या निर्णयाचा सकारात्मक परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होणार आहे.

तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक यश
हा करार अशा वेळी झाला आहे जेव्हा दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता. नाकेबंदीच्या काळात अमेरिकेच्या लढाऊ विमानाने इराणच्या एका तेलवाहू टँकरच्या 'रडर'ला (सुकाणू) लक्ष्य केले होते, ज्यामुळे संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणवर मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला होता. अशा परिस्थितीत, युद्धजन्य परिस्थिती टाळण्यासाठी आणि जागतिक अर्थव्यवस्था सावरण्यासाठी या राजनैतिक तोडग्याला मोठे यश मानले जात आहे.

हेही वाचा - Donald Trump: अमेरिकेकडून 'प्रोजेक्ट फ्रीडम'ला तूर्तास 'ब्रेक'; पण नाकेबंदी मात्र कायम, ट्रम्प यांच्या पोस्टने जगभरात खळबळ

अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
दोन्ही देशांमध्ये या करारावर गुरुवारी सहमती झाली असली तरी, अमेरिका किंवा इराण सरकारने अद्याप अधिकृतपणे यावर भाष्य केलेले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती स्थिर करण्यासाठी आणि ऊर्जा संकट रोखण्यासाठी हा मार्ग पुन्हा सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. या घडामोडीमुळे सागरी व्यापाराशी संबंधित कंपन्या आणि जागतिक बाजारपेठांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
 


सम्बन्धित सामग्री