Friday, March 13, 2026 01:12:27 PM

Uber Air Taxi: आता ट्रॅफिकचे टेन्शन विसरा! रस्त्यावर नाही, थेट आकाशात धावणार तुमची 'उबर टॅक्सी'; कुठे सुरू झाली सेवा? वाचा

विशेष म्हणजे, ज्या उबर (Uber) ॲपवरून आपण रस्ते टॅक्सी बुक करतो, त्याच ॲपद्वारे आता तुम्ही उडती टॅक्सीही बुक करू शकणार आहात.

uber air taxi आता ट्रॅफिकचे टेन्शन विसरा रस्त्यावर नाही थेट आकाशात धावणार तुमची उबर टॅक्सी कुठे सुरू झाली सेवा वाचा

Uber Air Taxi: मोठ्या शहरांमधील ट्रॅफिक ही एक डोकेदुखी बनली आहे. पण आता तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून राहण्याचे दिवस संपणार आहेत. दुबई शहर लवकरच 'एअर टॅक्सी' सेवा सुरू करून वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवणार आहे. विशेष म्हणजे, ज्या उबर (Uber) ॲपवरून आपण रस्ते टॅक्सी बुक करतो, त्याच ॲपद्वारे आता तुम्ही उडती टॅक्सीही बुक करू शकणार आहात.

वर्षाच्या अखेरीस सेवेचा प्रारंभ
दुबई या वर्षाच्या अखेरीस आपली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा अधिकृतपणे सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही सेवा कोणत्याही वेगळ्या प्लॅटफॉर्मवर नसून थेट 'उबर' ॲपमध्ये समाकलित केली जाईल. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही प्रवासासाठी अॅप उघडाल, तेव्हा तुम्हाला 'UberX' किंवा 'Uber Black' सोबतच 'Air Taxi' चा पर्यायही स्क्रीनवर दिसेल.

बुकिंग कशी करायची? (स्टेप-बाय-स्टेप)
एअर टॅक्सी बुक करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असेल:
1. गंतव्यस्थान निवडा: प्रथम उबर अॅपमध्ये तुम्हाला जिथे जायचे आहे त्या ठिकाणाचे नाव टाका.
2. पर्याय निवडा: जर त्या मार्गावर हवाई प्रवास शक्य असेल, तर तुम्हाला एअर टॅक्सीचा पर्याय दिसेल.
3. एंड-टू-एंड सेवा: एकदा तुम्ही बुकिंग केले की, एक टॅक्सी तुम्हाला तुमच्या ठिकाणाहून टेक-ऑफ पॉईंटपर्यंत (Vertiport) नेईल. तिथून तुम्ही एअर टॅक्सीत बसाल आणि लँडिंगनंतर पुन्हा रस्ते मार्गाने तुमच्या अंतिम स्थळी पोहोचवले जाईल. म्हणजे एकाच तिकीटात संपूर्ण प्रवास पूर्ण होईल.

तांत्रिक वैशिष्ट्ये: वेग आणि सुरक्षा
ही एअर टॅक्सी पूर्णपणे इलेक्ट्रिक असून ती eVTOL (Electric Vertical Take-off and Landing) तंत्रज्ञानावर आधारित आहे. या टॅक्सीचा कमाल वेग ताशी 321 किलोमीटर (200 मैल) इतका असेल. एका वेळी पायलटसह 4 प्रवासी यात बसू शकतील. तसेच एका चार्जवर ही टॅक्सी 160 किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते. यात 6 विशेष प्रोपेलर आहेत, जे हेलिकॉप्टरप्रमाणे उभ्या दिशेने उड्डाण करण्यास आणि उतरण्यास मदत करतात. तसेच, ही टॅक्सी परवानाधारक व्यावसायिक पायलटद्वारे चालवली जाईल.

प्रवाशांसाठी विशेष अनुभव
या एअर टॅक्सीची केबिन अतिशय आरामदायी असेल. यात मोठ्या खिडक्या असतील, ज्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना दुबईच्या गगनचुंबी इमारतींचे आणि विहंगम दृश्यांचे दर्शन घेता येईल. शहरात कमी अंतराचा प्रवास वेगाने आणि सुरक्षितपणे पूर्ण करणे हे या सेवेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

हेही वाचा - Apple Pay: भारतात लवकरच येणार 'ॲपल पे'? UPI आणि बँकांशी चर्चा सुरू; गुगल पे, फोन पेला मिळणार तगडी फाईट

भविष्यातील वाहतुकीचे मॉडेल
दुबईचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास, भविष्यात जगातील इतर मोठी शहरे देखील या मॉडेलचा अवलंब करू शकतात. दुबईने पुन्हा एकदा जगाला भविष्यातील वाहतूक व्यवस्था कशी असेल, याची झलक दाखवून दिली आहे.


सम्बन्धित सामग्री