मुंबई: 'आय लव्ह यू' म्हणणे छेडछाड किंवा लैंगिक छळ नाही, अशी महत्त्वपूर्ण टिपण्णी मुंबई उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान केली आहे. 2025 मध्ये एका किशोरवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली 35 वर्षीय पुरूषाला दोषमुक्त करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. 'आय लव्ह यू' म्हणणे केवळ भावनांची अभिव्यक्ती असून ती लैंगिक इच्छा व्यक्त करणे नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, सोमवारी दिलेल्या आदेशात, न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, कोणत्याही लैंगिक कृत्यामध्ये अनुचित स्पर्श, जबरदस्तीने कपडे काढणे, अश्लील हावभाव किंवा महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करण्याच्या उद्देशाने केलेली टिप्पणी यांचा समावेश आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
तक्रारीनुसार, आरोपीने नागपूरमधील 17 वर्षीय मुलीकडे जाऊन तिचा हात धरून तिला 'मी तुझ्यावर खूप प्रेम करतो' असे म्हटले. 2017 मध्ये नागपूर येथील सत्र न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली दोषी ठरवले आणि त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तथापी, उच्च न्यायालयाने त्या पुरूषाची शिक्षा रद्द करताना म्हटले की, पीडितेशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा त्याचा खरा हेतू होता हे दर्शविणारी कोणतीही परिस्थिती आढळली नाही. उच्च न्यायालयाने म्हटले की, 'मी तुझ्यावर प्रेम करतो' असे शब्द स्वतःमध्ये लैंगिक इच्छा (अभिव्यक्ती) च्या समतुल्य नसतील.'
हेही वाचा - मोठी बातमी! पाकिस्तानी न्यूज चॅनेल्स आणि स्टार्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील बंदी उठवली
उच्च न्यायालयाने म्हटले की, 'मी तुझ्यावर प्रेम करतो' असे म्हणण्यामागे जर लैंगिक हेतू असेल, तर ते सिद्ध करण्यासाठी काही ठोस आणि अतिरिक्त संकेत असले पाहिजेत, फक्त हे म्हणणे पुरेसे नाही. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, मुलगी शाळेतून घरी परतत असताना, त्या पुरूषाने तिचा हात पकडला, तिचे नाव विचारले आणि 'मी तुझ्यावर प्रेम करतो' असे म्हटले. मुलगी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली. त्यानंतर तिने तिच्या वडिलांना घटनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर संबंधित पुरुषाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.
हेही वाचा - चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी कशी झाली? CAT ने केला मोठा खुलासा
हा खटला लैंगिक छळाच्या कक्षेत येत नाही - उच्च न्यायालय
तथापी, उच्च न्यायालयाने म्हटले की, हा खटला छेडछाड किंवा लैंगिक छळाच्या कक्षेत येत नाही. तसेच न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे की, 'जर एखादी व्यक्ती म्हणते की तो एखाद्यावर प्रेम करतो किंवा त्याच्या भावना व्यक्त करतो, तर फक्त हे म्हणणे कोणत्याही प्रकारचा लैंगिक हेतू म्हणून पाहिले जाऊ शकत नाही.'