SIR Campaign 2026: प्रयागराजमध्ये मतदार यादीतील त्रुटी सुधारण्यासाठी राबवण्यात आलेल्या 'विशेष सघन सुधारणा' (SIR) मोहिमेने मतदारांची झोप उडवली आहे. या मोहिमेअंतर्गत पाठवण्यात आलेल्या नोटिसांमधील तार्किक विसंगती पाहून हजारो नागरिक डोके खाजवत आहेत. मतदार यादीत वयाची आणि नात्यांची अशी काही सरमिसळ झाली आहे की, काही ठिकाणी मुलाचे वय 45 वर्षे असून वडिलांचे वय मात्र केवळ 25 वर्षे नोंदवण्यात आले आहे. प्रशासनाच्या या तांत्रिक चुकांमुळे सामान्य कुटुंबांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तथापी, केंद्र सरकारच्या आदेशानंतर 4 नोव्हेंबर 2025 पासून, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह 12 राज्यांमध्ये मतदार ओळखपत्र पडताळणी सुरू करण्यात आली असून आता मतदार याद्यांमधील अनेक तांत्रिक चुका आता समोर येत आहेत.
एकाच व्यक्तीचे चार वडील? अजब नोंदींमुळे नागरिक हैराण
SIR मोहिमेदरम्यान डेटा तपासताना अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. करेली भागातील एका कुटुंबाला मिळालेल्या नोटीसमध्ये एका व्यक्तीचे चक्क 4 वडील असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दुसऱ्या एका प्रकरणात, एकाच व्यक्तीच्या पितृत्वाचा दावा इतर 6 जण करत असल्याचे यादीत दिसत आहे. इतकेच नाही तर, मतदार आणि त्यांच्या आजी-आजोबांच्या वयातील फरक 40 वर्षांपेक्षा कमी दाखवण्यात आल्याने संपूर्ण डेटा संशयास्पद ठरवण्यात आला आहे. या चुका मतदार यादी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या असताना, त्याचा नाहक त्रास मात्र सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.
सालोरीमध्ये महिला मतदार अस्वस्थ; कागदपत्रांचा फेरा कायम
सालोरी परिसरात एका महिला मतदाराला तिच्या आणि पालकांमधील वयाचा फरक 15 वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगणारी नोटीस बजावण्यात आली. यामुळे संबंधित महिला आणि तिचे कुटुंब अस्वस्थ झाले आहे. विशेष म्हणजे, मागील पुनरावृत्ती मोहिमेवेळी सर्व वैध कागदपत्रे सादर करूनही पुन्हा त्याच कारणांसाठी नोटिसा येत असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी BLO (बूथ लेव्हल ऑफिसर्स) या नोटिसांबाबत योग्य माहिती देत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
निवडणूक अधिकार्यांचे स्पष्टीकरण; यादी पारदर्शक करण्याचा प्रयत्न
या गोंधळावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी पूजा मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, 'तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना नोटिसा पाठवण्याचा एकमेव उद्देश मतदार यादी त्रुटीमुक्त आणि पारदर्शक करणे हा आहे. नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. सूचना मिळाल्यावर फक्त आवश्यक पुरावे सादर करावेत, त्यानंतर सर्व विसंगती दुरुस्त केल्या जातील.' या प्रक्रियेमुळे भविष्यात होणारे गैरप्रकार टाळता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Iran-Israel War Effect on Gold Price : आधीच दीड लाखांच्या घरात असणारं सोनं अजून घाम काढणार; इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या किंमतीचा भडका उडणार?
जिल्ह्यातील आकडेवारी आणि सुनावणीची स्थिती
प्रयागराज जिल्ह्यात तार्किक विसंगती असलेले एकूण 1,062,435 मतदार आढळले आहेत. त्यापैकी गुरुवारी संध्याकाळपर्यंत 1,062,323 (99.99 टक्के) मतदारांसाठी सूचना तयार करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 7,74,967 (72.94 टक्के) मतदारांना प्रत्यक्ष सूचना देण्यात आल्या असून, त्यापैकी 6,79,282 (61.94 टक्के) मतदारांची सुनावणी पूर्ण झाली आहे. ERO आणि AERO स्तरावर या तक्रारींचे निवारण सुरू असून, पडताळणीनंतर या सर्व पात्र मतदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट केली जातील.