Friday, March 13, 2026 01:24:58 PM

Heatwave Alert: उन्हाचा तडाखा वाढणार! IMD कडून मार्च ते मे दरम्यान देशात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा

यावर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत देशाच्या बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचे (Heatwave) दिवस सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

heatwave alert उन्हाचा तडाखा वाढणार imd कडून मार्च ते मे दरम्यान देशात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा

Heatwave Alert: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 2026 सालच्या उन्हाळ्याबाबत चिंताजनक अंदाज वर्तवला आहे. यावर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत देशाच्या बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचे (Heatwave) दिवस सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे सार्वजनिक आरोग्य, वीज पुरवठा आणि पाणी साठ्यावर मोठा ताण येण्याची चिन्हे आहेत.

'या' राज्यांना बसणार उष्णतेचा सर्वाधिक फटका
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब या राज्यांसह महाराष्ट्र (विशेषतः दक्षिण आणि पूर्व भाग), उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये कडाक्याचे ऊन पडणार आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी स्पष्ट केले की, हे हवामान वृद्ध, लहान मुले आणि कष्टाची कामे करणाऱ्या कामगारांसाठी आरोग्यविषयक गंभीर धोके निर्माण करू शकते.

पाऊस आणि एल निनोची स्थिती
मार्च महिन्यात सरासरी पाऊस सामान्य (29.9 मिमी) राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम आणि पूर्व-मध्य भारतात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहू शकते. दरम्यान, जागतिक हवामान बदलांचा परिणाम म्हणून विषुववृत्तीय प्रशांत महासागरात 'एल निनो'ची परिस्थिती पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

फेब्रुवारी ठरला उष्ण 
हवामान विभागाच्या अहवालानुसार, यंदा फेब्रुवारी महिन्यात देशात कुठेही शीतलहर (Coldwave) जाणवली नाही. 2001 नंतरचा हा सर्वात कमी पावसाचा फेब्रुवारी महिना ठरला आहे. सक्रिय 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' नसल्यामुळे उत्तर भारतात हिमवर्षावही कमी झाला. तापमानाच्या नोंदीनुसार, 1901 नंतरचा हा 10 वा सर्वाधिक उष्ण फेब्रुवारी ठरला असून कमाल आणि किमान तापमान दोन्ही सरासरीपेक्षा जास्त राहिले आहे.

हेही वाचा - Holi 2026: देशातल्या 'या' ठिकाणी अनोख्या पद्धतीने साजरा होतो रंगांचा सण; कुठे कपडे फाडले जातात तर कुठे लाठ्यांचा वर्षाव!

खबरदारी घेण्याचे आवाहन
उष्णतेच्या लाटेमुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः दुपारी उन्हात बाहेर पडणे टाळावे आणि पाण्याचे भरपूर सेवन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
 


सम्बन्धित सामग्री