Saturday, June 14, 2025 04:39:46 AM

ऐकावं ते नवलचं! चक्क चोरांनी गावकऱ्यांविरुद्ध दाखल केला FIR; म्हणाले, 'आम्हालाही अधिकार आहे...!'

चोरांचा आरोप आहे की चोरीदरम्यान गावकऱ्यांनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली, ज्यामुळे एक चोर गंभीर जखमी झाला, तर इतर तीन जण जखमी झाले.

ऐकावं ते नवलचं चक्क चोरांनी गावकऱ्यांविरुद्ध दाखल केला fir म्हणाले आम्हालाही अधिकार आहे
Edited Image

रांची: चोरीच्या घटनांबाबत तुम्ही अनेक प्रकरणे वाचली किंवा ऐकली असतील. दररोज पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल होतात. परंतु, अलिकडेच झारखंड राज्यात अशी घटना घडली आहे, जी ऐकूण तुम्हाला धक्का बसेल. रांचीच्या जगन्नाथपूर पोलिस स्टेशन परिसरात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरांनी गावकऱ्यांविरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. चोरांचा आरोप आहे की चोरीदरम्यान गावकऱ्यांनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली, ज्यामुळे एक चोर गंभीर जखमी झाला, तर इतर तीन जण जखमी झाले. ही घटना 4-5 जून 2025 च्या रात्री सत्यारी टोला येथे घडली. ही चोरीची घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

प्राप्त माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील रहिवासी विजय कुमार आणि त्याच्या पाच साथीदारांनी रात्री एक वाजता घर लुटण्याचा प्रयत्न केला. विजय कुमारने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याने आणि त्याचे साथीदार कमलेश चौहान, पंकज डोम, जान सिंग, मदू चौहान आणि करण चौहान यांनी घराच्या कपाटातून सोन्याची साखळी आणि रोख रक्कम चोरली.

मालकाला विहिरीत बुडवण्याचा प्रयत्न

दरम्यान, घरमालक जागा झाला आणि 'चोर, चोर' असे ओरडला. चोरांनी घरमालकाला गळा दाबून नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि जवळच्या विहिरीत बुडवण्याचा प्रयत्न केला. परंतु घरमालकाने केलेल्या आवाजामुळे जागे झालेल्या गावकऱ्यांनी चोरांना घेरले.

गावकऱ्यांकडून चोरांना बेदम मारहाण - 

विजय कुमारच्या म्हणण्यानुसार, गावकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्याचा डावा हात तुटला. तर कमलेश चौहान, पंकज डोम आणि जान सिंग यांनाही गंभीर दुखापत झाली. त्याचे दोन साथीदार, मदू चौहान आणि करण चौहान घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

हेही वाचा - माकडाचा विचित्र कारनामा! व्यावसायिकाकडून हिसकावली 20 लाख रुपयांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांनी भरलेली बॅग

चोरांनी गावकऱ्यांविरोधात केली तक्रार - 

दरम्यान, 5 जून रोजी सकाळी गावकऱ्यांनी चार चोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, ज्यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याला उत्तर म्हणून विजय कुमार यांनी ग्रामस्थांवर मारहाणीचा आरोप करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्या मते, हे चोर कुख्यात लुंगी-बनियान गँगचे सदस्य आहेत, जे चोरी करताना लुंगी-बनियान घालतात आणि पकडले गेल्यास सहज पळून जाण्यासाठी अंगावर तेल लावतात.

हेही वाचा - OMG! 20 वर्षांपासून पोहून पार करतात शाळेपर्यंतचे अंतर! कोण आहेत व्हायरल 'ट्यूब मास्टर'?

या अनोख्या चोरीच्या घटनेने स्थानिकांचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. जमावाकडून कायदा हातात घेण्याच्या घटनांना कसा आळा घालायचा यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. तथापि, पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या तक्रारींवरून कारवाई करण्यास सुरुवात केली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 


सम्बन्धित सामग्री