Mamata Banerjee: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "हा भाजपचा नैतिक विजय नसून निवडणूक आयोग आणि केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने केलेली लुटालूट आहे," असा गंभीर आरोप करत त्यांनी निकालांना अवैध ठरवले आहे.
निवडणूक आयोग 'भाजपचा आयोग' असल्याची टीका
ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, "भाजपने पश्चिम बंगालमध्ये 100 हून अधिक जागा लुटल्या आहेत. आज निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिला नसून तो 'भाजपचा आयोग' बनला आहे. आम्ही वारंवार मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) आणि मनोज अग्रवाल यांच्याकडे पुराव्यांसह तक्रारी केल्या, परंतु त्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही."
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप
निकालांमधील पारदर्शकतेवर बोलताना दीदी म्हणाल्या, "तुम्हाला खरंच हा विजय वाटतोय का? हा पूर्णपणे अनैतिक विजय आहे. निवडणूक आयोग, केंद्रीय सुरक्षा दले, खुद्द पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी मिळून जे काही या निवडणुकीत केले आहे, ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हा लोकशाही संपवण्याचा कट असून बंगालमध्ये केवळ लूटमार आणि लूटमारचं झाली आहे."
"आम्ही पुन्हा मुसंडी मारू"
पराभवाने खचून न जाता ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा संघर्षाचे संकेत दिले आहेत. "भाजपने सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर करून हा आकडा गाठला असला, तरी बंगालची जनता त्यांच्यासोबत नाही. आम्ही शांत बसणार नाही. या अन्यायाविरोधात आम्ही पुन्हा जोरदार मुसंडी मारू आणि जनतेच्या दरबारात जाऊ," असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा - Vijay Thalapathy : तामिळनाडूत 'विजय' नावाचं वादळ! रजनीकांत-कमल हासन यांना जे जमलं नाही, ते थलपतीने करून दाखवलं; 'ही' खेळी ठरली यशस्वी
राजकीय वातावरण तापले
ममता बॅनर्जींच्या या विधानामुळे बंगालमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. एकीकडे भाजप सत्तास्थापनेच्या तयारीत असताना, दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने (TMC) निकालांविरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचे संकेत दिले आहेत.