Wednesday, February 18, 2026 08:40:41 AM

Budget 2026: यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठी तरतूद; कर्करोग आणि मधुमेहाची औषधे होणार स्वस्त

विशेषतः कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा देत, या औषधांच्या किमती कमी करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

budget 2026 यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठी तरतूद कर्करोग आणि मधुमेहाची औषधे होणार स्वस्त

Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत देशाचा 2026 चा अर्थसंकल्प सादर केला. आपल्या 9 व्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी आरोग्यसेवा, देशांतर्गत उत्पादन आणि रोजगार निर्मितीवर विशेष भर दिला आहे. विशेषतः कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा देत, या औषधांच्या किमती कमी करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

औषध निर्मितीसाठी 10,000 कोटींची गुंतवणूक
आरोग्य क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकारने औषध निर्मिती (Pharmaceuticals) क्षेत्रात 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे देशांतर्गत औषध उत्पादनाला गती मिळेल आणि परदेशांवरील अवलंबित्व कमी होईल. "बायोफार्मा शक्ती" या नवीन योजनेद्वारे भारताला जागतिक स्तरावर बायोफार्मा उत्पादनाचे केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. ही योजना पुढील पाच वर्षांत 10,000 कोटी रुपयांच्या खर्चाने राबवली जाणार आहे.

हेही वाचा - Union Budget 2026: 'रिफॉर्म एक्सप्रेस’द्वारे भारताच्या औद्योगिक संप्रभुतेकडे मोठे पाऊल: बायो-फार्मा, सेमीकंडक्टर आणि रेअर अर्थ क्षेत्रांवर भर

आयुर्वेद आणि प्रादेशिक आरोग्य केंद्रांवर भर
देशातील आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी अर्थसंकल्पात तीन नवीन आयुर्वेदिक रुग्णालये बांधण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच, विविध राज्यांमध्ये पाच नवीन प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. केवळ मानवी आरोग्यच नव्हे, तर पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या विकासावर आणि त्यांच्यासाठी असलेल्या सुविधांवरही या अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आले आहे.

वृद्धांसाठी विशेष वैद्यकीय सुविधा
वाढत्या वयोमानानुसार उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या लक्षात घेऊन, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वैद्यकीय सेवा सुविधांमध्ये सुधारणा करण्याची ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली आहे. गरिबी निर्मूलन आणि आरोग्य सुरक्षा या दोन प्रमुख स्तंभांवर सरकार काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. अनिश्चित जागतिक परिस्थितीतही भारताने गेल्या १२ वर्षांत आर्थिक स्थिरता आणि वित्तीय शिस्त राखल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

स्वावलंबन आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग
अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात 'स्वावलंबन' या तत्त्वाचा पुनरुच्चार केला. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असून, या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग अधिक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 


सम्बन्धित सामग्री