Aadhaar Deactivated: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) डेटाबेसची शुद्धता राखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. देशातील तब्बल 2.5 कोटींहून अधिक आधार क्रमांक निष्क्रिय (Delete) करण्यात आले आहेत. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी होणारा गैरवापर आणि संभाव्य आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने लोकसभेत दिली माहिती
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, हटवण्यात आलेले हे सर्व 2.5 कोटी आधार क्रमांक अशा व्यक्तींचे होते ज्यांचा मृत्यू झाला आहे. आधार ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली असून सध्या 1.34 अब्ज सक्रिय आधार धारक आहेत. डेटाबेसमधील अचूकता कायम ठेवण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली.
हेही वाचा - Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या आजच्या दरांनी बाजारात खळबळ; चांदी स्वस्त? सोन्याचे दर चढ-उतारासह...
ओळखीच्या पुराव्याचा गैरवापर रोखण्यासाठी पाऊल
सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, आधार हा केवळ ओळखीचा पुरावा आहे, नागरिकत्वाचा नाही. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या आधार क्रमांकाचा वापर करून अनधिकृतपणे कल्याणकारी लाभ मिळवणे किंवा ओळखीची फसवणूक करणे (Identity Fraud) असे प्रकार घडण्याची शक्यता असते. हे धोके टाळण्यासाठी मृत व्यक्तींचे आधार निष्क्रिय करणे अनिवार्य असल्याचे सरकारने म्हटले आहे.
सुरक्षेसाठी नवीन 'आधार ॲप' लाँच
UIDAI ने 28 जानेवारी रोजी एक नवीन आणि प्रगत आधार ॲप लाँच केले आहे, जे जुन्या mAadhaar पेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. या ॲपची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
फॅमिली प्रोफाइल: एकाच मोबाईल नंबरवरून स्वतःसह कुटुंबातील 5 सदस्यांचे आधार प्रोफाइल जोडता येतील.
घरबसल्या सेवा: आधार केंद्रावर न जाता मोबाईल नंबर बदलणे यासारखी कामे घरबसल्या करता येतील.
प्रगत सुरक्षा: यामध्ये 'सिम बाइंडिंग' (Sim Binding) तंत्रज्ञान वापरले आहे, ज्यामुळे आधारशी लिंक असलेले सिम फोनमध्ये असल्याशिवाय ॲप चालणार नाही.
बायोमेट्रिक लॉक: युजर्स आपले बायोमेट्रिक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी लॉक करू शकतील.
फिजिकली आधार कार्ड बाळगण्याची गरज नाही
या नवीन ॲपमध्ये QR-आधारित पडताळणी सुविधा देण्यात आली आहे. यामुळे आता प्रत्यक्ष आधार कार्ड सोबत बाळगण्याची गरज उरलेली नाही. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध असून, लवकरच यातून नाव आणि ईमेल पत्ता बदलण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.