Sunday, May 10, 2026 08:37:41 PM

Assembly Election Results 2026: बड्या नेत्यांना जनतेने नाकारलं; ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन यांच्यासह 'या' 5 दिग्गजांचा पराभव

सर्वात धक्कादायक निकाल पश्चिम बंगालमधून समोर आला, जिथे मुख्यमंत्री आणि 'TMC' सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा त्यांच्या पारंपरिक भवानीपूर मतदारसंघात पराभव झाला.

assembly election results 2026 बड्या नेत्यांना जनतेने नाकारलं ममता बॅनर्जी एमके स्टॅलिन यांच्यासह या 5 दिग्गजांचा पराभव

Assembly Election Results 2026: 4 मे रोजी जाहीर झालेल्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी देशाच्या राजकीय पटलावर अनेक मोठे बदल घडवून आणले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली, तर तामिळनाडूमध्ये 'थलपती' विजय यांच्या 'TVK' या नवीन पक्षाने सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. केरळमध्ये दर 5 वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'UDF' ने 102 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली 'NDA' ने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली, तर पुद्दुचेरीमध्येही 'NDA' ने आपली सत्ता कायम राखली आहे.

पराभवाचा धक्का बसलेले 'हे' 5 प्रमुख चेहरे
या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक निकाल पश्चिम बंगालमधून समोर आला, जिथे मुख्यमंत्री आणि 'TMC' सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा त्यांच्या पारंपरिक भवानीपूर मतदारसंघात पराभव झाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनाही त्यांच्या हक्काच्या कोलाथूर मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमधील काँग्रेसचा मुख्य चेहरा अधीर रंजन चौधरी यांना बहरामपूरमध्ये पराभव पत्करावा लागला, तर आसाममध्ये काँग्रेसचे भविष्य मानले जाणारे गौरव गोगोई आणि ज्येष्ठ नेते देवव्रत सैकिया यांनाही अपयश आले. तसेच ममतांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शशी पांजा (श्यामपुकुर) आणि मौसम नूर (मालतीपूर) यांनाही जनतेने नाकारले आहे.

विजयाचा गुलाल उधळणारे 'जायंट किलर्स'
एकीकडे दिग्गज पडत असताना दुसरीकडे काही नेत्यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. भवानीपूरमधून भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 15,105 मतांच्या फरकाने पराभव करत 'जायंट किलर' ठरले आहेत. कोलकाता येथील राशबिहारी मतदारसंघातून भाजपचे स्वप्न दासगुप्ता यांनी देबाशिष कुमार यांचा 20,865 मतांनी पराभव केला. मुर्शिदाबादचे दिग्गज नेते हुमायून कबीर यांनी नौदा आणि रेजिनगर अशा दोन्ही जागा जिंकून आपला दबदबा सिद्ध केला आहे.

हेही वाचा - Tamil Nadu Politics : तामिळनाडूत विजय थलापती देणार काँग्रेसला संजीवनी? वडिलांनी दिली सत्तेची ऑफर

आपली सत्ता आणि स्थान टिकवणारे दिग्गज नेते
काही मुख्यमंत्र्यांनी आपली वैयक्तिक जागा आणि लोकप्रियता कायम राखण्यात यश मिळवले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जालुकबारी मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. तामिळनाडूतील एडापड्डी मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांनी आपली जागा कायम राखली, जे 'AIADMK' साठी दिलासादायक ठरले. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी धर्मदम मतदारसंघातून पुन्हा एकदा विजय मिळवत आपले खंबीर नेतृत्व सिद्ध केले, तर पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री आणि 'AINRC' प्रमुख एन. रंगासामी यांनी मंगलम मतदारसंघातून विजय नोंदवला आहे.


सम्बन्धित सामग्री