Emergency Landing Facility : भारताच्या युद्धसत्तेच्या शिरपेचात आज मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. ईशान्य भारताची संरक्षण क्षमता अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सीमेजवळ 'धावपट्टी सक्षम महामार्ग' (Emergency Landing Facility - ELF) यशस्वीरीत्या कार्यान्वित केला आहे. चीनच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर, दुर्गम भागातही भारतीय हवाई दलाची फायटर विमाने आता थेट हायवेवर उतरू शकणार आहेत. यामुळे भारतीय सीमांचे रक्षण करण्याची क्षमता अनेक पटींनी वाढली असून शत्रूवर हल्ला करण्यासाठी लागणारा वेळही कमी झाला आहे.
तज्ज्ञांचे मत: 'रिस्पॉन्स टाइम'मध्ये होणार मोठी घट
संरक्षण तज्ज्ञ चंद्रशेखर नेने यांनी या सुविधेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, "हायवेवर फायटर विमाने उतरण्याची आणि तिथून उड्डाण करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शत्रूवर हल्ला करण्याचा वेळ (Response Time) अत्यंत कमी होतो. आधुनिक युद्धतंत्रात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व असते. जर मुख्य विमानतळांवर काही तांत्रिक अडचण आली किंवा शत्रूने हल्ला केला, तर हे महामार्ग पर्यायी धावपट्टी म्हणून काम करतात. यामुळे भारतीय हवाई दल कोणत्याही परिस्थितीत शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाले आहे."
चीनच्या आव्हानाला भारताचे चोख उत्तर
'चीनची स्वतःची विमानतळ सीमावर्ती भागापासून साधारण 2 ते 3 तासांच्या अंतरावर आहेत. अशा परिस्थितीत जर चीनने भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले किंवा काही कुरापत काढली, तर भारताकडे तातडीने कारवाई करण्यासाठी अशा धावपट्ट्या असणे आवश्यक आहे. ईशान्य भारतातील या नवीन प्रकल्पामुळे भारतीय हवाई दलाची विमाने आता शत्रूच्या अगदी जवळून उड्डाण करू शकतील. यामुळे शत्रूवर प्रतिहल्ला करण्याची भारताची शक्ती आणि वेग दोन्ही वाढले आहेत,' असंही नेने यांनी सांगितलं.
हेही वाचा - National Highway Toll Rules : अपूर्ण राष्ट्रीय द्रुतगती मार्गांवर आता 'हा' टोल बंद; 15 फेब्रुवारीपासून नवे नियम लागू
ही धावपट्टी भारतासाठी का महत्त्वाची आहे?
ईशान्य भारतातील ही धावपट्टी अनेक कारणांमुळे धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरते. ही धावपट्टी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) जवळ असल्याने, आपत्कालीन परिस्थितीत सुखोई-30 MKI आणि राफेल यांसारखी विमाने तातडीने तैनात करता येतील. युद्धव्यतिरिक्त, मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात या धावपट्टीचा वापर मोठ्या मालवाहू विमानांच्या लँडिंगसाठी करून मदतकार्य वेगाने पोहोचवता येईल. मुख्य तळांवरील धावपट्ट्या शत्रूच्या रडारवर असतात. मात्र हायवेवरील या सुविधेमुळे शत्रूला भारतीय विमानांच्या नेमक्या ठिकाणाचा अंदाज बांधणे कठीण होईल. लष्करी तुकड्या आणि शस्त्रास्त्रांची हालचाल दुर्गम भागात जलद गतीने करणे या सुविधेमुळे शक्य होणार आहे.