Friday, February 13, 2026 12:19:33 AM

Rahul Gandhi Speech: संसदेत 'या' अप्रकाशित पुस्तकावरून रणकंदन; राहुल गांधींनी असा कोणता गौप्यस्फोट केला की अमित शहा-राजनाथ सिंह भडकले?

माजी लष्करप्रमुखांच्या एका अप्रकाशित पुस्तकातील उताऱ्यांचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी चिनी घुसखोरीवरून केंद्र सरकारला लक्ष्य केले.

rahul gandhi speech संसदेत या अप्रकाशित पुस्तकावरून रणकंदन राहुल गांधींनी असा कोणता गौप्यस्फोट केला की अमित शहा-राजनाथ सिंह भडकले

Rahul Gandhi Speech: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्याने सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. माजी लष्करप्रमुखांच्या एका अप्रकाशित पुस्तकातील उताऱ्यांचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी चिनी घुसखोरीवरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. यामुळे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र आक्षेप नोंदवला, परिणामी सभागृहाचे कामकाज तब्बल 45 मिनिटे विस्कळीत झाले.

अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ आणि राजनाथ सिंहांचा आक्षेप
राहुल गांधी यांनी सभागृहात माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या अद्याप प्रकाशित न झालेल्या आत्मचरित्राचा उल्लेख केला. डोकलाम आणि चिनी घुसखोरीबाबत या पुस्तकात धक्कादायक तथ्ये असल्याचा दावा करत राहुल गांधींनी त्याचे वाचन सुरू केले. यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संतापले आणि त्यांनी जागेवर उभे राहून थेट आव्हान दिले की, "ज्या पुस्तकाचा संदर्भ दिला जात आहे, ते अद्याप प्रकाशितच झालेले नाही, मग ते सभागृहात कसे मांडले जाऊ शकते?" राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींना ते पुस्तक सभागृहात सादर करण्याची मागणी केली.

"सत्य दडपण्याचा सरकारचा प्रयत्न"; राहुल गांधींचा आरोप
राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्र्यांच्या आक्षेपाला उत्तर देताना सांगितले की, त्यांचा स्रोत पूर्णपणे वैध आणि प्रामाणिक आहे. "सरकार या पुस्तकाचे प्रकाशन रोखत आहे कारण त्यामध्ये डोकलामबद्दल अशी काही तथ्ये आहेत जी सरकारला लपवायची आहेत. यात भीती वाटण्यासारखे काय आहे? जर सरकारकडे लपवण्यासारखे काही नसेल, तर मला हे उतारे वाचू दिले पाहिजेत," असा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केला. सभापती ओम बिर्ला यांनी मात्र अप्रकाशित पुस्तकाचे वाचन करण्यास मनाई केली.

अमित शहांचा प्रतिप्रश्न; 'पुराव्याशिवाय आरोप कसे?'
या वादात गृहमंत्री अमित शहा यांनीही हस्तक्षेप केला. "जे पुस्तक सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाही किंवा प्रकाशित झालेले नाही, त्याचा आधार घेऊन सरकारवर गंभीर आरोप करणे संसदीय नियमांच्या विरोधात आहे," असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पुराव्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर असे भाष्य करणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Uttarakhand Avalanche Alert : उत्तराखंडमध्ये 'हिमस्खलनाचा' धोका वाढला! उत्तरकाशी, चमोलीसह 5 डोंगराळ जिल्ह्यांत हाय अलर्ट

सभागृहात 45 मिनिटे गोंधळ
राहुल गांधींनी सरकारवर सत्य दडपल्याचा आरोप केल्याने भाजप खासदार आक्रमक झाले, तर दुसरीकडे काँग्रेस खासदारांनीही घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज काही काळ ठप्प झाले होते. डोकलाममधील नेमकी परिस्थिती आणि माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकातील मजकूर आता राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
 


सम्बन्धित सामग्री