PM Modi On BJP Victory : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. राज्यातील 21 महानगरपालिकांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवत विजयाची 'हॅटट्रिक' साधली आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवरून मराठीत पोस्ट करत भाजपच्या विजयाचा आनंद व्यक्त करत जनतेचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्रातील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले आहे की, 'महाराष्ट्राचे आभार! राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या (NDA) जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत. विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे.' पंतप्रधानांनी पुढे नमूद केले की, हा कौल केवळ राजकीय विजय नसून तो राज्याच्या प्रगतीला अधिक गती देणारा आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे.
हेही वाचा - BMC Election Results 2026 : मुंबई महापालिकेची आताची आकडेवारी काय?; पहा अजून किती जागांचे अंतिम निकाल येणं बाकी, पक्षनिहाय आकडेवारी समोर
भाजपचे 29 पैकी 21 शहरांत वर्चस्व
या निवडणुकीत भाजपने राज्यातील महानगरांमध्ये आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. एकूण 29 महानगरपालिकांपैकी 21 महापालिकांत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये मिळालेल्या विजयाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
हेही वाचा - BJP Municipal Victory : महाराष्ट्रात महायुतीच! 29 पैकी 21 महापालिकांवर भाजपचं कमळ फुललं; शिंदे ते ठाकरे...; कोणत्या पक्षाची कुठे सत्ता?
विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर
पंतप्रधानांच्या मते, केंद्र आणि राज्य सरकारच्या सुशासनावर जनतेने विश्वास टाकला आहे. महायुती सरकारने राबवलेल्या लोकोपयोगी योजना आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा हा विजय असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या विजयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचे स्थान अधिक भक्कम झाले असून, आगामी राजकीय वाटचालीसाठी हा निकाल अत्यंत निर्णायक ठरणार आहे.