Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात भारत-चीन सीमेजवळ झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. कामगारांना घेऊन जाणारा एक ट्रक खोल दरीत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ट्रकमध्ये एकूण 21 कामगार प्रवास करत होते. घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
हेही वाचा - RBI : 'आता फायदा लोकांना होऊदे...', आरबीआयच्या सार्वजनिक आणि खासगी बँकांना निर्देश
हयुलियांग-चगलगाम मार्गावर दुर्घटना
ही दुर्घटना हयुलियांग-चगलगाम रस्त्यावर घडली. डोंगराळ, अरुंद आणि वळणावळणाच्या या मार्गावरून ट्रक जात असताना वाहनाचा ताबा सुटला. त्यानंतर वाहन थेट सुमारे 1000 फूट खोल दरीत कोसळले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक टप्प्यात डझनभराहून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित कामगारांचा शोध सुरू आहे. कठीण भूभागामुळे बचाव कार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा - E-cigarette Controversy: संसदेत खळबळ! अनुराग ठाकूर यांचा TMC खासदारावर ई-सिगारेट ओढल्याचा गंभीर आरोप
कामावर जाताना काळाचा घाळा
दुर्घटनाग्रस्त ट्रकमधील कामगार हे असममधील तिनसुकिया जिल्ह्यातील गेलापुखुरी टी इस्टेटचे असल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण बांधकाम मजूर म्हणून हयुलियांग येथे कामावर जात होते. दरम्यान, रस्त्याची अवस्था आणि खराब हवामानामुळे अपघाताचे प्रमाण अधिक गंभीर झाले असल्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. घटनेच्या कारणांचा सविस्तर तपास सुरू असून राज्य सरकारने दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.