Miracle Baby Rescue : छत्तीसगडच्या जांजगीर जिल्ह्यातून मानवतेला थक्क करणारी आणि निसर्गाचा चमत्कार वाटावी अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माकडाने आईच्या कुशीतून हिसकावून विहिरीत टाकलेल्या 15 दिवसांच्या नवजात मुलीचा प्राण सुदैवाने वाचला आहे. या घटनेत बाळाच्या 'डायपर'ने लाईफ जॅकेटसारखे काम केले, तर एका नर्सने दिलेल्या वेळेवरच्या 'सीपीआर'मुळे (CPR) ही मुलगी मृत्यूच्या दारातून सुखरूप परतली आहे.
आईच्या कुशीतून बाळाला पळवलं
मिळालेल्या माहितीनुसार, जांजगीरच्या शिवानी नैला गावात अरविंद राठोड यांची पत्नी आपल्या 15 दिवसांच्या बाळाला दूध पाजत होती. त्याच वेळी अचानक एका माकडाने तिथे येत झडप घातली आणि क्षणार्धात आईच्या कुशीतून बाळाला हिसकावून घेऊन पळ काढला. आईचा आक्रोश ऐकून गावकरी माकडाच्या मागे धावले. गावकरी मागे लागल्याने घाबरलेला माकड बाळाला घेऊन एका झाडावर चढले, पण तिथेच त्याच्या हातातून बाळ निसटून खाली असलेल्या खोल विहिरीत पडले.
डायपर बनले 'लाईफ जॅकेट'
बाळ विहिरीत पडल्याने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, विहीर पाण्याने भरलेली असतानाही बाळ बुडण्याऐवजी पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत राहिले. यावर डॉक्टरांनी स्पष्ट केले की, डायपरमधील 'सुपर अॅब्सॉर्बंट पॉलिमर'ने पाणी शोषले आणि ते एअर बॅगसारखे फुगले, ज्यामुळे बाळाचे शरीर 10 ते 15 मिनिटे पाण्यावर तरंगत राहिले आणि बाल बुडण्यापासून वाचवले.
हेही वाचा - Stray Dogs: आता भटक्या कुत्र्यांनाही बसवणार मायक्रोचिप्स; 35 कोटींच्या योजनेमागचं नेमकं गुपित काय?
नर्सच्या देवदूतासारख्या एन्ट्रीने वाचले प्राण
दरम्यान, चिमुरडीला विहिरीतून बाहेर काढले तेव्हा तिचा श्वास थांबला होता आणि शरीर थंड पडले होते. योगायोगाने गावात श्रीमद् भागवत कथा सुरू असल्याने तिथे कथा ऐकण्यासाठी एक नर्स आली होती. तिने वेळ न घालवता बाळाला जमिनीवर झोपवले आणि तातडीने सीपीआर व कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू केला. काही मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर बाळाने रडण्यास सुरुवात केली आणि अख्ख्या गावाने सुटकेचा श्वास सोडला.
डॉक्टरही चकीत; "हा तर चमत्कारच!"
बाळाला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला पूर्णपणे धोक्याबाहेर घोषित केले. "वेळेवर मिळालेला सीपीआर आणि डायपरमुळे बाळ तरंगत राहणे हा खरोखरच एक चमत्कार आहे," असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. मुलीचे वडील अरविंद राठोड यांनी भावूक होत हा आपल्या मुलीचा दुसरा जन्म असल्याचे सांगितले.