Wednesday, February 18, 2026 09:07:37 AM

Zomato CEO Resigns : स्टार्टअप विश्वात खळबळ! दीपिंदर गोयल यांचा झोमॅटोच्या CEO पदाचा राजीनामा; आता 'ही' व्यक्ती सांभाळणार धुरा

झोमॅटोचे (Zomato) सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) दीपिंदर गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

zomato ceo resigns  स्टार्टअप विश्वात खळबळ दीपिंदर गोयल यांचा झोमॅटोच्या ceo पदाचा राजीनामा आता ही व्यक्ती सांभाळणार धुरा

Zomato CEO Resigns : भारताच्या स्टार्टअप क्षेत्रातील एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. झोमॅटोचे (Zomato) सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) दीपिंदर गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. झोमॅटो आणि ब्लिंकिटची मूळ कंपनी असलेल्या 'एटरनल'च्या (Eternal) बोर्डातील फेरबदलानुसार आता अल्बिंदर धिंडसा यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राजीनाम्याचे नेमके कारण काय?
शेअरहोल्डर्सना संबोधित करताना दीपिंदर गोयल यांनी आपल्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली. गोयल म्हणाले की, "गेल्या काही काळापासून मला उच्च जोखीम असलेल्या आणि नवनवीन प्रयोगांना वाव असलेल्या कल्पनांमध्ये अधिक रस निर्माण झाला आहे. सार्वजनिकरित्या सूचीबद्ध (Listed Company) असलेल्या कंपनीच्या चौकटीत राहून असे मोठे प्रयोग करणे कठीण असते. हे प्रयोग खाजगी स्तरावर अधिक प्रभावीपणे करता येतील, या विचारातून मी पदावरून पायउतार होत आहे." मात्र, गोयल कंपनीशी पूर्णपणे नाते तोडणार नाहीत, ते 'एटरनल'च्या बोर्डावर उपाध्यक्ष (Vice Chairperson) म्हणून कार्यरत राहतील.

हेही वाचा - Budget 2026:शेतकऱ्यांना ‘लॉटरी’ लागणार? 1 फेब्रुवारीला होऊ शकतात मोठे निर्णय

कोण आहेत नवीन CEO अल्बिंदर धिंडसा?
दीपिंदर गोयल यांची जागा घेणारे अल्बिंदर धिंडसा हे सध्या 'ब्लिंकिट' (पूर्वीची ग्रोफर्स) चे सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. भारतातील 'इन्स्टंट कॉमर्स' क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. अल्बिंदर यांनी आयआयटी दिल्लीतून शिक्षण घेतले असून कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीए केले आहे. योगायोगाने, त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दीपिंदर गोयल यांच्यासोबत 'बेन अँड कंपनी'मध्ये काम केले होते. 2013 मध्ये त्यांनी 'ग्रोफर्स' सुरू केले, ज्याचे 2021 मध्ये 'ब्लिंकिट' असे नामकरण करण्यात आले. त्यांनी भारतात "10 मिनिटांत डिलिव्हरी" हे मॉडेल यशस्वी करून दाखवले. 2022 मध्ये झोमॅटोने ब्लिंकिटचे अधिग्रहण केले. तेव्हापासून अल्बिंदर झोमॅटोच्या एकूण व्यवसायातील एक महत्त्वाचा स्तंभ बनले आहेत.

दीपिंदर गोयल यांनी शून्यातून उभे केलेले झोमॅटो साम्राज्य

दरम्यान, पंजाबच्या मुक्तसर येथील रहिवासी असलेल्या दीपिंदर गोयल यांनी 2008 मध्ये पंकज चड्ढा यांच्यासोबत 'फूडीबे' नावाने कंपनी सुरू केली होती, जी पुढे 'झोमॅटो' म्हणून प्रसिद्ध झाली. ऑफिस कॅन्टीनमधील मेनू कार्डचे फोटो काढून ऑनलाइन टाकण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज अब्जावधी डॉलर्सच्या कंपनीपर्यंत पोहोचला आहे. 2021 मध्ये झोमॅटो शेअर बाजारात सूचीबद्ध झाली, जी भारतीय टेक कंपन्यांसाठी एक ऐतिहासिक घटना होती.

मैत्री आणि व्यवसायाचा दुर्मिळ संगम
विशेष म्हणजे, दीपिंदर गोयल आणि अल्बिंदर धिंडसा हे केवळ व्यावसायिक भागीदार नसून आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी आणि जुने मित्रही आहेत. दोघांच्या कार्यपद्धतीत साधर्म्य असून, आता अल्बिंदर यांच्या नेतृत्वाखाली झोमॅटो आणि ब्लिंकिटचा एकत्रित प्रवास कोणत्या दिशेने जातो, याकडे संपूर्ण गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
 


सम्बन्धित सामग्री